जी. जी. पी. एस. गुरुकुलामध्ये रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम

रत्नागिरी : शहरातील जी. जी. पी. एस. प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरूकुलामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असतात. यावर्षी नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रशालेतील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील भाट्ये समुद्रकिनारी जाऊन समुद्राला नारळ अर्पण केला. तसेच, सागर किनाऱ्याची स्वच्छताही केली. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशालेतील विद्यार्थीनींनी रत्नागिरी बसस्थानक, नगर परिषद तसेच रत्नागिरी पोलीस स्थानक या ठिकाणी जाऊन रक्षाबंधन साजरे केले.

त्याचप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून या दिवशी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींनी लांज्यातील जावडे येथील आश्रमशाळेसही भेट दिली व तेथील विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले. सामाजिक बांधिलकी जपणे व बंधुत्वभावना वाढीस लावणे या हेतूने या भेटींचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गुरुकुल विभागातील सर्व शिक्षक तसेच काही शिक्षकेतर कर्मचारीही या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. संपूर्ण उपक्रम गुरुकुल विभागप्रमुख श्री. वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जी.जी.पी.एस. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने पार पडला.