ज्येष्ठ हिंदी साहित्यिक विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर

छत्तीसगड : छत्तीसगडचे सुप्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोदकुमार शुक्ल यांना देशातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान, ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे आज ही घोषणा करण्यात आली.
विनोदकुमार शुक्ल रायपूर, छत्तीसगड येथे राहतात. त्यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला.
गेली ५० वर्षे ते साहित्य लेखनात सक्रिय आहेत. त्यांचा पहिला कवितासंग्रह “लगभग जय हिंद” १९७१ मध्ये प्रकाशित झाला. “नौकर की कमीज”, “खिलेगा तो देखेंगे” आणि “दीवार में एक खिडकी” या त्यांच्या कादंबऱ्या हिंदी साहित्यातील उत्कृष्ट कादंबऱ्या मानल्या जातात. यासोबतच “पेड़ पर कमरा” आणि “महाविद्यालय” हे त्यांचे कथासंग्रह आणि “वह आदमी चला गया, नया गरम कोट पहन कर”, “आकाश धरती को खटकता है” आणि “कविता से लंबी कविता” या त्यांच्या कविता खूप लोकप्रिय झाल्या आहेत. विनोदकुमार शुक्ल यांनी मुलांसाठीही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. विनोदकुमार शुक्ल यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, रझा पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कारांचा समावेश आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर विनोदकुमार शुक्ल म्हणाले, “हा खूप मोठा पुरस्कार आहे आणि या पुरस्कारामुळे मला माझ्या जबाबदारीची जाणीव होते.”
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी विनोदकुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “ही छत्तीसगडसाठी अभिमानाची बाब आहे. शुक्लजींनी देशाच्या साहित्यिक व्यासपीठावर छत्तीसगडला पुन्हा एकदा गौरवाची संधी दिली आहे.”