डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या ‘हॅलो जिंदगी’ कथा संग्रहाचे प्रकाशन
रत्नागिरी : कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य मैफिलीचे आयोजन, श्रीराम मंदिर, रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या काव्य संध्येच्या वेळी डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्या “हॅलो जिंदगी” या कथा संग्रहाचे प्रकाशन सौ. ऊर्मिला घोसाळकर, अध्यक्षा, मंगलमूर्ती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर संस्था तसेच रोटरी व रत्नागिरी बार असोसिएशनच्या अध्यक्षा ऍड. सौ. शाल्मली अंबुलकर यांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जेष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. दिलीप पाखरे, बी एड्. महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य श्री. प्रताप सावंतदेसाई, गीता मंडळाचे अध्यक्ष आणि शिवाजीनगर वाचनालयाचे सचिव ऍड. श्री. मिलिंद पिलणकर, भारत शिक्षण मंडळाचे सल्लागार श्री. विनायकराव हातखांबकर, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त श्री. सुधाकरराव सावंत, श्री. दीपक राऊत, जेष्ठ गजलकार श्री. देविदास पाटील आणि जेष्ठ कविवर्य श्री. सिराज खान, श्री. जियाउल्ला अताउल्ला खान ही मंडळी उपस्थित होती.
आपल्या सर्व्हीकल कॅन्सरच्या उपचारांच्या कालावधीत आलेले व रोजच्या जीवनात आलेले अनुभव डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी कथांमधून मांडले आहेत. वृत्तपत्रे, आकाशवाणी आणि मासिके यांमध्ये कथा, कविता, ललित आणि वैज्ञानिक लेख लिहिणाऱ्या डॉ. मोहिते यांचे लिखाण सर्वाना परिचित आहेच. हा त्यांचा तिसरा कथा संग्रह असून, त्यांच्या अधांतरी या कथा संग्रहाला मुंबईच्या एकता कला अकादमीतर्फे मानाचा दया पवार स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री. मदन हजेरी, स्पर्श प्रकाशन, पुणे हे “हॅलो जिंदगी” या कथा संग्रहाचे प्रकाशक असून, हा संग्रह अमेझॉनवर वाचकांना उपलब्ध आहे असे त्यांनी कळवले आहे.