दापोली समर सायक्लोथॉन सिझन सातमध्ये १५० कि.मी. सायकल चालवण्याचे आव्हान

दापोली : दापोली समर सायक्लोथॉन सिझन सात मध्ये १५० कि.मी. सायकल चालवण्याचे आव्हान असणार आहे. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे ११ व १२ मे २०२५ रोजी सकाळी दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत.

ही सायकल स्पर्धा १ ते १५० किमी अंतराची असून ३० व ५० किमी कोस्टल सिनिक रुट, ४ ते १५० किमी शॉर्ट सिटी लूप, १ व २ किमी फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ५०, ७५, १००, १२५, १५० किमी सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी २००, ३००, ४००, ५००, ६०० रोख रक्कम बक्षिस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसे पण असतील. १२ तासात १५० किमी अंतर पूर्ण करण्याचे आव्हान असेल. ५० किमी कोस्टल सिनिक रुट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते आसूद, सालदुरे, पाळंदे, बायपास रोड, आंजर्ले पूल, अडखळ, पाजपंढरी, हर्णै, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल.
फन राईड विनामूल्य असून इतर राईड साठी आगाऊ नोंदणी आवश्यक आहे. ऑनलाईन नोंदणी लिंक https://www.townscript.com/e/dsc7 आहे. ऑफलाईन नोंदणी फॉर्म विनी इलेक्ट्रिकल फॅमिली माळ, श्री सायकल मार्ट, जोशी ब्रदर्स मेडिकल बाजारपेठ, दत्ता मोबाईल कामगार गल्ली या ठिकाणी उपलब्ध आहेत. नोंदणी करण्याची अंतिम तारीख ५ मे असेल. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ हे आहेत. सर्वांनी सराव सुरु करा आणि आपल्या कुटुंबियांसमवेत यामध्ये सहभागी होत जास्तीच जास्त अंतर सायकल चालवा असे आवाहन करण्यात आले आहे.