महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

दिग्गज कलाकारांची कला पाहायला मिळणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भाग्यच : प्रकाश राजेशिर्के

चित्रकार विजय टिपुगडे, कोल्हापूर

संगमेश्वर : दैनंदिन सराव , कमालीचे निरीक्षण , वेगवेगळे प्रयोग आणि सततचे वाचन यामुळे कलाकार घडत असतो. सातत्याने केला जाणारा सराव आपल्या कामाला विशिष्ट उंचीवर घेऊन जातो. सह्याद्री कला महाविद्यालयात येणारे दिग्गज कलाकार हे कलाक्षेत्रात नामवंत असूनही आपल्या कलेच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. अशा दिग्गज कलाकारांची प्रात्यक्षिके पहायला मिळणे हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी भाग्याचेच आहे, असे प्रतिपादन सह्याद्री कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी केले.

चित्रकार – सूर्यकांत होळकर, मिरज

सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयात वार्षिक कला प्रदर्शनाचे औचित्य साधून ज्येष्ठ निसर्ग चित्रकार एस. निंबाळकर, संपत नायकवडी , मिरज आर्ट कॉलेजचे प्राचार्य चित्रकार सूर्यकांत होळकर , चित्रकार – शिल्पकार उत्तम साठे, आपल्या वेगळ्याच शैलीने नावारूपास आलेले निसर्ग चित्रकार नागेश हंकारे, कोल्हापूरचे निसर्ग चित्रकार विजय टिपुगडे यांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रकाश राजेश शिर्के सर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिग्गज कलाकारांसमवेत सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, शिल्पकार प्रा. रुपेश सुर्वे, प्रा. प्रदीप कुमार देडगे , प्रा. अवधूत खातू , प्रा. विक्रांत बोथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

चित्रकार  – एस. निंबाळकर, कोल्हापूर

उपस्थित सर्व दिग्गज कलाकारांचा प्राचार्य माणिक यादव यांनी उपस्थितांना परिचय करून दिला. सह्याद्री कला महाविद्यालयातर्फे सर्व दिग्गज कलाकारांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित कला महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक आणि कलारसीक यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूरचे ज्येष्ठ निसर्ग चित्रकार एस. निंबाळकर म्हणाले की , कलेच्या विद्यार्थ्यांनी दररोज न चुकता स्केचिंग करणे आवश्यक आहे. याबरोबरच निसर्ग चित्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या सजगदृष्टीने प्रथम निसर्ग मनोमन अनुभवला पाहिजे. निसर्गात होणारे बदल जाणून घेतले पाहिजेत . नित्यनेमाने आपण हे करायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच निसर्गचित्राची आवड निर्माण होऊन उत्तम उत्तम कलाकृती आपल्या हातून घडू लागतात. मात्र हे करण्यासाठी दैनंदिन सराव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असून आपल्या कलाकृतीने प्रथम आपल्याला समाधान आणि आनंद दिला पाहिजे, म्हणजे तो रसिकाला आपोआप मिळतो असा आपला अनुभव असल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

चित्रकार – नागेश हंकारे, कोल्हापूर

सह्याद्री कला महाविद्यालयाच्या परिसरात या पाचही दिग्गज कलाकारांनी सुमारे दीड ते दोन तासांच्या अवधीत अप्रतिम अशी प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये उत्तम साठे यांनी तैल रंगांमध्ये प्रकाश राजेश शिर्के सर यांचे उत्तम असे व्यक्तिचित्र साकारले . निसर्ग चित्रकार एस निंबाळकर , विजय टिपूगडे , सूर्यकांत होळकर यांनी आपापल्या कुंचल्यातून आगळीवेगळी आणि सुंदर अशी निसर्ग चित्रे साकारली. चित्रकार संपत नायकवडी यांनी एक अमूर्त आकारातील चित्र साकारले. निसर्ग चित्रकार नागेश हंकारे यांची निसर्गचित्र साकारण्याची स्वतःची अशी एक वेगळी शैली असून, चित्राकृती साकारण्यासाठी ते एक एक महिना हिमाचल आणि अन्य पहाडी भागात जाऊन येथील दर्या खोऱ्यांचा निसर्ग कॅनव्हासवर हुबेहूब साकारतात. हंकारे यांनी ऍक्रेलिक कलर मध्ये कॅनव्हास आडवा करून त्यावर रंग सर्वत्र पसरून घेतले, त्यानंतर रद्दीच्या कागदाने हे रंग स्वतःला हवे त्या पद्धतीने पसरून अखेरीस त्यावर रोलर आणि ब्रशने दरीखोऱ्यांचे सुंदर असे निसर्ग चित्र साकारले. हंकारे यांची ही वेगळीच शैली पाहून विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्यासह अन्य कलाकारांच्या प्रात्यक्षिकाचे स्वागत केले.

चित्रकार – संपत नायकवडी, कोल्हापूर

अशी प्रात्यक्षिके पहायला मिळणे हे आमचे भाग्य

सह्याद्री कला महाविद्यालय हे कोकणातील एक प्रयोगशील कला महाविद्यालय आहे. येथे दरवर्षी कले मधील विविध प्रयोग पाहायला आणि अनुभवायला मिळतात. वार्षिक कला प्रदर्शनामध्ये राज्याच्या विविध भागातून प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी येणारे चित्रकार शिल्पकार म्हणजे आमच्यासारख्या कला विद्यार्थ्यांसाठी खरोखरच भाग्याचा क्षण असतो. अशा दिग्गज कलाकारांची प्रात्यक्षिके पाहून आमच्या ज्ञानात कमालीची भर पडते, याबरोबरच आमचा आत्मविश्वास देखील वाढतो.

भक्ती देशमुख, कला विद्यार्थीनी.

कला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास
वाढविण्यावर भर

सह्याद्रीकला महाविद्यालयात दरवर्षी वार्षिक कला प्रदर्शनाच्या निमित्ताने शिल्प चित्र यांची कला जत्रा भरविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार कला महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश अर्जुन राजेश शिर्के आणि सह्याद्री शिक्षण संस्था यांच्या संकल्पनेतून राज्याच्या विविध भागातील कलाकार आपली अनोखी कला कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमोर सादर करतात. यासारख्या प्रयत्नामुळे आमच्या कला महाविद्यालयाचे विद्यार्थी राज्य प्रदर्शनासह विविध स्पर्धांमध्ये उत्तम यश मिळवत असल्याचा आमचा अनुभव आहे.

माणिक यादव, प्राचार्य.

चित्रकार उत्तम साठे, पुणे

Deepak

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button