दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी याबाबत जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लब तर्फे रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
आझाद मैदान दापोली येथून सुरु झालेली सायकल फेरी उदयनगर, लष्करवाडी, बहुविकलांग दिव्यांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र जालगाव, बर्वे आळी, पांगारवाडी, शिवाजीनगर, इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय, आझाद मैदान अशा ६ किमीच्या मार्गावर झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक तसेच काही दिव्यांगही सायकल चालवत सहभागी झाले होते. आनंद फाऊंडेशन संचलित दिव्यांग व बहुविकलांग गतिमंद विद्यार्थ्यांचे पुनर्वसन केंद्र जालगांव आणि स्नेहदीप संचलित इंदिराबाई वामन बडे कर्णबधीर विद्यालय येथे स्मिता सुर्वे, निलांबरी अधिकारी, दिनेश जैन, मनोहर जैन, रेखा बागुल, मनोहर जालगावकर, संजय बलाध्ये, सूर्यकांत खेडेकर, श्रद्धा गोविलकर, शितल देवरुखकर, ज्योती बर्वे, महेश्वरी विचारे, मीनल माने, विनय रेवाळे, कौस्तुभ देऊळगावकर, इतर शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी अद्ययावत कार्यशाळा, श्रवण यंत्रणा, दिव्यांग विद्यार्थी, उपक्रम, रोजगार प्रशिक्षण इत्यादींबाबत माहिती सांगितली व शाळा दाखवली. त्यांचे हे खूपच आव्हानात्मक असे बहुमूल्य समाजकार्य आहे, याबद्दल या सर्वांचे आभार मानण्यात आले. अपंगत्वावर मात करुन यशस्वीपणे स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केलेल्या श्रावणी सूर्यवंशी आणि इतर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, विनय गोलांबडे, सुरज शेठ, सुधीर चव्हाण इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.