दीडशेहून अधिक स्पर्धकांचा दापोली विंटर सायक्लोथॉनमध्ये सहभाग

- दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५ उत्साहात संपन्न
दापोली : सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५, सिझन ८ सायकल स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. यामध्ये राज्यातील वय ७ ते ८० वयोगटातील १६० स्पर्धक सहभागी झाले होते. दापोली, उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, देवके, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, आसूद या समुद्रकिनाऱ्यावरील ५० किमी मार्गावर कोकणातील निसर्ग सौंदर्य अनुभवत सर्वांनी सायकल चालवली. मार्गावर असलेल्या अनेक पर्यटन ठिकाणांना भेटी दिल्या, कोकणी खाद्यपदार्थ, मासे इत्यादींचा आस्वाद घेतला.

ही सायक्लोथॉन स्पर्धा ५० किमी किंगफिशर सिनिक रुट, २०० किमी शॉर्ट सिटी लूप, फन राईड अशा अनेक गटात झाली. सर्व स्पर्धकांना मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यामध्ये नुकतेच दिल्ली ते कोलकाता ते पुणे असा ३४४४ किमीचा सायकल प्रवास केलेले पुणे येथील ८० वर्षीय गौतम भिंगानिया, यूरोपमधील ८ देशातून जाणाऱ्या नॉर्थ केप ४००० या ४००० किमीच्या स्पर्धेत सहभागी झालेले विश्वनाथन सर पुणे, अनेक लांब अंतराच्या राईड करणारे विद्याधर पालकर, फिरोझ खान पुणे इत्यादी अनेक नावाजलेले रायडर्स सहभागी झाले होते. या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून विठोबा चव्हाण, अजय सुर्वे हे एका दिवसात मुंबई ते दापोली सायकल चालवत आले होते. ५० किमी किंगफिशर सिनिक रुट सायक्लोथॉन पूर्ण करणारे छोटे सायकलस्वार तन्मय उन्मेष नागपुरे पुणे (वय १०), दिशांत पवार खेड (वय १२), अवधूत पाथे, वरद कदम, आयुष जोशी, पियुष पवार हे ठरले.

शॉर्ट सिटी लूप मार्गावर आयुष शिंदे, श्लोक मोहिते यांनी १००+ किमी, स्वराज राजपूरकर, प्रेम भुसारे, पार्थ पालटे, दिप कदम, आरुष इदाते इत्यादींनी ८०+ किमी सायकल चालवली. सायक्लोथॉनसाठी दापोली शिक्षण संस्था, दापोली तालुका आरोग्य अधिकारी व टीम, दापोली पोलीस टीम, मेनेकी नुट्रीशन, राहुल मंडलिक इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले.
या सायक्लोथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात अंबरीश गुरव, प्रशांत पालवणकर, राजेशकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुधीर चव्हाण इत्यादी अनेकांनी मोलाची भूमिका बजावली.





