पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले श्री देव कुणकेश्वराचे दर्शन

- ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ उपक्रमाचे केले कौतुक
देवगड : महाशिवरात्रीच्या पावन सोहळ्यानिमित्त कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वराचे राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. दर्शनानंतर उपस्थित भाविकांशी संवाद देखील साधला.
या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा आशीर्वाद लाभला आहे, “कुणकेश्वर हा केवळ धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे. या परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. या भागाच्या विकासकामांसाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी मी कटीबद्ध असून ती जबाबदारी निश्चितपणे मी पूर्ण करणार आहे असे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, यात्राकाळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना आणि सुरक्षाव्यवस्था यांसारख्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि प्रशासन यांच्या समन्वयातून विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने कामे हाती घेतली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरवर्षी कुणकेश्वर यात्रेला यशस्वी बनविण्यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असते, असे नमूद करत त्यांनी प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. यावर्षी प्रशासनाने राबवलेल्या ‘प्लास्टिक मुक्त यात्रा’ या उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. भाविकांना अधिक सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी स्थानिक पदाधिकारी, देवस्थान समितीचे सदस्य, अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





