पैसा फंडच्या कलादालनामुळे विद्यार्थ्यांना कलाक्षेत्रात नवी दिशा : गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील
कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांची प्रगती नेत्र दीपक
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरने प्रशालेत स्वतंत्र कला विभाग निर्माण करून कला विषयाला दिलेले आगळे वेगळे स्थान कला क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडण्यास आणि नवी दिशा देण्यास उपयुक्त ठरत आहे. प्रशालेत कलेचे प्राथमिक धडे घेऊन येथील विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात केलेली प्रगती नेत्र दीपक असल्याचे प्रतिपादन संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी केले.
परख राष्ट्रीय सर्व्हेक्षण परीक्षेच्या निमित्ताने आज गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी संगमेश्वरच्या पैसा फंड इंग्लिश स्कूलला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत या परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निदेशक जिंदल विद्या मंदिर जयगडच्या योगिता भोपळे, केंद्रप्रमुख दिलीप जाधव, संदेश पवार, पैसा फंड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी पाटील पुढे म्हणाले की, पैसा फंड कलादालन पाहण्यासाठी तालुक्यातील प्राथमिक शाळा येतात ही नक्कीच उल्लेखनीय बाब आहे. येथील माजी विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे रसिकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी आहेत .
कला वर्ग आणि कलादालन उपक्रम सुरू केल्यानंतर जवळपास २५० पेक्षा अधिक विद्यार्थी कलाक्षेत्रात स्वतःच्या पायावर सक्षम होऊ शकले हेच या उपक्रमाचा यश असल्याचे पाटील यांनी नमूद केले. येथील कला वर्गात विद्यार्थ्यांना दिले जाणारे डिजिटल कलाशिक्षण हा एक अभिनंदननीय प्रयोग असून यामुळे विद्यार्थी अधिक सजग होणार आहेत असे पाटील यांनी नमूद केले. कलादालनातील सर्वच कलाकृती एका पेक्षा एक सुंदर असून येथे आल्यानंतर सर्व ताण हलका होतो आणि एक नवी ऊर्जा मिळते असेही पाटील यांनी नमूद केले. कला विभागातर्फे तयार केल्या जाणाऱ्या कला साधना या चित्रकला वार्षिकचे पाटील यानी कौतुक केले.
जिंदल विद्यामंदिर जयगडच्या योगिता भोपळे यांनी, शाळेमध्ये अशा प्रकारचा उपक्रम असणं हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन यावेळी केले. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, जयगड विद्यामंदिरच्या योगिता भोपळे आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी कला वर्ग आणि कलादालनाला भेट दिल्याबद्दल त्यांना संस्थे तर्फे धन्यवाद दिले.