पैसा फंड संस्थेने विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळवून द्यावी : प्रमोद जठार
- सिंधू – रत्न समिती सहकार्य करेल
- कलाकृती अंतर्मुख करतात
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरने मुंबई गोवा महामार्गालगत उभारलेले ” पैसा फंड कलादालन ” हे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पाहण्याची एक उत्तम संधी असून संस्थेने येथील कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळवून द्यावी त्यासाठी आवश्यक ते सहकार्य सिंधूरत्न समिती नक्की करेल, असे आश्वासन समितीचे पदाधिकारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिले.
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरच्या प्रशालेला आणि कलादालनाला आज माजी आमदार प्रमोद जठार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत सामाजिक कार्यकर्ते सतीश पटेल आणि मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सचिव धनंजय शेट्ये यांनी सन्मान चिन्ह देऊन प्रमोद जठार यांचा सत्कार केला. प्रशालेच्या परिसरात अँपी थिएटर उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना करून यासाठी सिंधू रत्न समिती शासनाच्या माध्यमातून नक्की सहकार्य करेल असेही जठार यांनी नमूद केले.
पैसा फंड कलादालन पाहताना माजी आमदार प्रमोद जठार अक्षरशः भारावून गेले. येथील माजी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या कलाकृती अविश्वसनीय आहेत. येथील माजी विद्यार्थ्यांसह कलाकारांच्या कलाकृतींना बाजारपेठ मिळाली पाहिजे, यासाठी प्रशाले जवळच एक विक्री केंद्र सुरू करण्याची सूचना देखील जठार यांनी केली. मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात येणारे पर्यटक ज्यावेळी पैसा फंडचे कलादालन पाहतील त्यावेळी त्यांना आवडलेल्या कलाकृती विकत घेण्याची संधी या विक्री केंद्रावर उपलब्ध होऊ शकेल, असे जठार यांनी नमूद केले. कला दालनातील काही विशेष कलाकृती आणि कलाकारांबाबत जठार यांनी अधिक माहिती जाणून घेतली. यावेळी पैसा फंडचे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.