भारतरत्न’ सन्मानित शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात मोठे व्हा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, दि.16 : भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर यांच्या उभारण्यात आलेल्या शिल्पांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आयुष्यात एवढे मोठे व्हा, तुमचे देखील शिल्प उभारले जाईल, अशा शुभेच्छा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिल्या.
स्वयंवर मंगल कार्यालय येथील कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी आणि बचतगटांच्या महिलांना भारतरत्न सन्मानित शिल्प लोकार्पण निमित्तानं पालकमंत्री डॉ. सामंत मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजेंद्र महाडीक, बिपीन बंदरकर, स्मिता पावसकर, सुदेश मयेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत यावेळी म्हणाले, ज्यांनी हे पुतळे बनवले त्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही सर्वांनी बघितलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. सुमारे 25 टन वेस्ट मधून सहा पुतळे एका ठिकाणी उभे करण्यात आले आहेत. हे देशात पहिल्यांदा आपल्या रत्नागिरीमध्ये होतंय. एखादे शिल्प तयार करण्यासाठी नऊ नऊ महिने विद्यार्थी मेहनत घेत असतील तर त्यांची अंग मेहनत काय असते, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. यातून विद्यार्थ्यांनी काही संकल्पना शिकली पाहिजे. भारतरत्न सन्मानित महर्षी धोंडू केशव कर्वे, पांडूरंग वामन काणे, विनोबा भावे, डॉ. भीमराव आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रात केलेले सामाजिक काम, त्यांचा आदर्श, प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रत्नागिरीच्या कोर्टामध्ये देखील खटला चालवलेला आहे. एवढ्या उत्तुंग नेतृत्त्वाने देशाला चांगली लोकशाही दिली. देशाला चांगली घटना दिली. ही व्यक्ती आपल्या रत्नागिरीची होती आणि अशा पद्धतीचा आदर्श विद्यार्थ्यांनी ठेवावा. देशातला अरबी समुद्राला चिकटून असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर कुठे असेल तर तुमच्या आणि माझ्या रत्नागिरी मध्ये. महाराष्ट्रातलं सगळ्यात देखणं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं आज रत्नदुर्ग किल्ल्याच्या शेजारी केलेले आहे.
आता रत्नागिरी शहर हे छोटे शहर राहिलेले नाही. पुण्यापेक्षा चांगली शैक्षणिक सुविधा ही रत्नागिरीमध्ये सुरू होतेय. मेडिकल कॉलेजची पुढची स्टेप, त्याला आपण पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणतो. ते एमडी आणि एम एस देखील पुढच्या वर्षीपासून रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र शासन सुरू करत आहे. जोपर्यंत शिकलेली पिढी नव्या नव्या आयडिया घेऊन राजकारणामध्ये येत नाही, तोपर्यंत राजकारण देखील आधुनिक होणार नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.
जे जे स्कूल ऑफ ऑर्टचे शिक्षक शशिकांत काकडे, विजय बोंदर, विद्यार्थी विजय पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि महिला उपस्थित होत्या.