महाराष्ट्रलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवायला पाहिजे : संगीतकार कौशल इनामदार

‘गर्द निळा गगन झुला’निमित्ताने अशोक बागवे आणि कौशल इनामदार यांचा रसिकांशी संवाद

रत्नागिरी : जे वापरात नाही ते गंजतं, याप्रमाणे जे शब्द वापरले जात नाहीत ते कालौघात मागे पडतात आणि शब्दसंपदेतला तारा निखळत जातो. वीज वाढवायची असेल तर तिचा वापर कमी केला पाहिजे पण भाषा वाढवायची असेल तर तिचा वापर वाढवला पाहिजे, असे सांगतानाच शब्दांचा वारसा आपल्याला घरातून मिळतो पण आज अंगाई गाणाऱ्या आयाच आपल्याकडे नाहीत, अशी खंत ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित “गर्द निळा गगन झुला” मैफलीत डावीकडून सुबोध चित्ते, ज्येष्ठ कवी अशोक बागवे, संगीतकार कौशल इनामदार आणि अस्मिता पांडे. तबला साथ करताना किरण लिंगायत.

नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात ‘गर्द निळा गगन झुला’ ही बहारदार मैफल ज्येष्ठ कवी अशोक बागवे आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी रंगवली. यावेळी सुबोध चित्ते आणि अस्मिता पांडे यांनी या द्वयींशी संवाद साधत त्यांचा सांगीतिक प्रवास रसिक श्रोत्यांसमोर उलगडला.

या मैफलीची सुरुवात अशोक बागवे यांच्या “वासाचा पयला पाऊस आयला” या संगमेश्वरी बोलीतील गीताने झाली. कौशल आणि आपल्या भेटीविषयी सांगताना अशोक बागवे यांनी कौशलचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. असे असताना बोलीभाषेतील कवितेला चाल कशी लावणार असा प्रश्न होता, असले तरी ज्याची नाळ मराठीशी जोडलेली आहे त्याला शब्दांचे श्वास कळतात आणि म्हणूनच आज तो मराठीतील एक उत्तम संगीतकार म्हणून उदयाला आल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही ७०-८० गाणी एकत्र केली, असे सांगितले. कविता समजत नसतानाही चाल दिली, पण चाल दिल्यानंतर जस जशी कविता पुढे जात होती तस तशी ती अधिक उलगडत गेली. त्यामुळे मी बिंदास जे येईल ते करत गेलो, असे इनामदर यांनी सांगितले.

“आधी शब्द की आधी चाल” या प्रश्नाला उत्तर देताना दोघांनीही मूल जन्माला आल्यानंतर मग कपडे शिवतात, कपड्याच्या मापावर मूल जन्माला येत नाही, असे विनोदत्मक उत्तर दिले. गीतकाराला सुरांचे संकेत काढायला पाहिजे शब्दात चाल दडलेली असते. म्हणून आधी शब्द मग चाल, असे त्यांनी सांगितले. शब्द हा अवकाशाचा गुण आहे तो कवीने पकडला नाही तर परत जातो. शब्द कुठे वापरायचे हे कळले तर तो कवी, आताचे ग्रुप वरचे फॉरवर्ड नव्हे, अशी कोपरखळी बागवे यांनी मारली. शब्दांच्या विविध छटा आहेत. कवीला, गीतकाराला त्या माहिती पाहिजे. सुदैवाने शब्द माऊली शांताबाई शेळके या माझ्या गुरु होत्या त्यामुळे लहानपणापासूनच मला हे ज्ञान होते, असेही यावेळी बागवे यांनी सांगितले. संगीतकाराला शब्दांचा अभ्यास करावा लागतो का या प्रश्नाला उत्तर देताना इनामदार यांनी मी अजूनही अभ्यासच करतो, रियाज थांबवत नाही, असे सांगितले. शांततेत पंख्याच्या आवाजाचा पॅटर्न तयार होतो त्यातून एक लय तयार होते ते सतत ऐकणे हाही रियाज असतो, असे ते म्हणाले. यावेळी शांताबाई शेळके यांच्या “रिमझिम बरसत श्रावण आला, साजण नाही आला” आणि या गीताला बागवे यांनी उत्तर दिलेली “झोका मंद झुले श्रावण आला ग मन कसे दरवळे साजण आला ग” ही गीते सादर केली. त्यानंतर बागवे यांनी”गुनूगुनू वाजं घुंगडू, टूनूटूनू नाचं झुमरू” हे स्वतःच्याच कवितेला चाल लावलेले गाण सादर केले, इनामदार यांनी महाविद्यालयीन जीवनात स्वतः लिहिलेली “गुरुर इतना क्यो हैं तुम्हे ए घटाओ, किसी और को अपने तेवर दिखाओ” ही गझल सादर केली.

दुपारच्या वेळेवर एकही कविता नाही हा विचार करून “सुन्न गगनमंडलात भिरभिरते घार… अशी दुपार” हे गाणे या गाण्या मागची कथा सांगून सादर केले. बागवे यांच्या कवितेत कोकण डोकावतो, याबद्दल सांगताना ते म्हणाले कोकणासारखे रम्य ठिकाण आणखी कोणते, सवाल बागवे यांनी उपस्थित केला. बरीचशी गाणी कोकणात येतानाच सुचली तो कोकणभूमीचा आशीर्वाद आहे असे मी मानतो हे सांगताना “दे ना रे पुन्हा पुन्हा गर्द निळा गगन झुला” हे गाणे सादर केले. या गाण्याला रसिकांकडून ‘वन्स मोअर’चा प्रतिसाद मिळाला. कारुण्याची कैफियत, भावनांचा परमोच्य बिंदू म्हणजे गझल असे सांगताना “चांदणे वळले कुशीवर जागली पहाट, तारकांची आवरावर भागली पहाट” ही गझल सादर केली. या मैफलीची सांगता “माझा मराठीचा बोल वाजे काळजात खोल” या बागवे यांनी लिहिलेल्या अभंगाने झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन टेकाळे यांनी केले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये मनोगत व्यक्त करून पाहुण्यांचे स्वागत केले. या मैफलीला किरण लिंगायत यांनी उत्कृष्ट तबला साथ केली. हार्मोनियमवर स्वतः कौशल इनामदार होते. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button