मंगळागौरी व जास्वंदी स्वयंसहायता बचत गटातर्फे ‘भोंडला’ उत्साहात संपन्न
उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : मंगळागौरी व जास्वंदी स्वयंसहायता गटातर्फे मराठी संस्कृतीचा जागर करण्यासाठी व आपली संस्कृतीची जपणूक करून पुढील पिढीतील तरूणींपर्यंत पोहचवण्याकरीता माजी सरपंच भावना कैलास म्हात्रे व डाॅ. रंजना संजीव म्हात्रे यांच्या संकल्पनेतून भोंडला आयोजित करण्यात आला होता.
खोपटे गावामध्ये प्रथमच भोंडल्याच आयोजन करण्यात आल्यामुळे सर्व लहान मुलींपासून ते महिला वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलावर्ग उपस्थित राहुन पारंपरिक भोंडल्याची ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’ ‘कारल्याच वेल लावून ग सुने’ ‘ अरडी ग बाई परडी’ ‘श्री भगवंता कमलाकांता ‘ अशी गाणी गावून व नाचून आनंद साजरा केला.
या प्रसंगी डाॅ. रंजना म्हात्रे यांनी भोंडल्याची कथा व माहिती सर्वांना सांगीतली व भावना म्हात्रे, सुरेखा भोईर यांनी गाणी गायली, सर्वाना खिरापत वाटली . बचत गटाच्या अध्यक्ष रंजना पुर्णानंद म्हात्रे व हिरावती श्रीधर म्हात्रे यांनी आभार मानले, दिपाली हरेश ठाकूर ,प्रणीता म्हात्रे मानसी म्हात्रे, जागृती म्हात्रे, श्रीमती संगीता म्हात्रे,जयश्री म्हात्रे, प्रगती म्हात्रे, मालती म्हात्रे, संध्या राजभर आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
भोंडला सण म्हणजे नेमकी काय असतो ?
भारतीय परंपरेमध्ये प्रत्येक सणाला आगळेवेगळे महत्व आहे. भोंडला सणाला सुद्धा भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व आहे.भोंडला हा सण मुलींचा(महिलांचा )विशेष आवडता आहे. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते त्या दिवसापासून ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे.नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो.एका पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात. त्याभोवती फेर धरून छोट्या मुली, व शाळेतल्या मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात.जिच्या घरी भोंडला असतो, तिची आई खिरापत करते. रोज बहुधा वेगळे घर आणि त्यामुळे वेगळी खिरापत असते. म्हणजे पहिल्या दिवशी १, दुसऱ्या दिवशी २ अशा करत करत ९ व्या दिवशी ९ + १ खिरापत असते. फेर धरताना एक छोट्या मुलींचा व १ मोठ्या मुलींचा. असे २ फेरे होतात.सर्वच मुली गाणी म्हणतात. नवरात्रीच्या नऊ दिवसात हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्याभोवती मुली फेर धरतात.
पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. बहु उंडल असा याचा अपभ्रंश आहे असेही मानले जाते.हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ तांदूळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात.या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या ठिपक्यांनी झूल काढतात. रंगीबेरंगी फुलांच्या माळा घालून त्याला सजवतात. याच भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.भोंडला किंवा हादगा याचे कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.