मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरी दौऱ्यात दिल्या विविध गणेश मंडळांना भेटी

- मानाच्या गणरायांचे घेतले दर्शन
रत्नागिरी : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात, महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज, १ सप्टेंबर रोजी रत्नागिरी शहराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांना आणि घरगुती गणपतींना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

ना. राणे यांच्या दौऱ्याची सुरुवात नाचणे रोडवरील ॐ साई मित्रमंडळाला भेट देऊन झाली. त्यानंतर त्यांनी मारुती मंदिरातील श्री रत्नागिरीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आठवडा बाजारातील रत्नागिरीचा राजा आणि १०० वर्षे पूर्ण केलेल्या ऐतिहासिक टिळक आळी मित्रमंडळाला भेट दिली.
सार्वजनिक मंडळांसोबतच त्यांनी घरगुती गणपतींनाही भेट दिली. यामध्ये बंदर रोड येथील दिनू सावंत यांचा गणपती आणि शेरे नाका येथील संघ कार्यवाह गजानन करमरकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी बाप्पांचे दर्शन घेतले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्यासह राजू मयेकर, अशोक वाडेकर, दादा ढेकणे, विवेक सुर्वे, दादा दळी आणि प्रतीक देसाई यांसारखे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात ना. राणे यांच्या या आपुलकीच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.