मधुबन कट्टयावर कवितेच्या माध्यमातून बरसल्या ‘पाऊस धारा’
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उरण शाखेचा उपक्रम
उरण (विठ्ठल ममताबादे ) : पावसाची आतुरता हा विषय घेऊन मधुबन कट्ट्यावर संपन्न झालेल्या १०४ व्या कविसंमेलनात ज्येष्ठ नागरिकांना काव्यरूपी पाऊसधारा अनुभवायला मिळाल्या. कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण तर्फे विमला तलाव उरण शहर येथील मधुबन कट्ट्यावर माजी नगरसेवक माणिकराव पाटील यांच्या अध्यक्षते खाली कवी संमेलन संपन्न झाले.
या कविसंमेलनात कु. अनुज शिवकर, दौलत पाटील, हेमंत पाटील, संजय होळकर, मारूती तांबे, रामचंद्र म्हात्रे,अजय शिवकर,मच्छिंद्र म्हात्रे, प्रा.साहेबराव ओहळ, नरेश पाटील प्रा. एल. बी. पाटील आदी कवींनी आतुरता पावसाची या विषयावर आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या उत्तर भागात सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यात योगदान देणा-या उरणातील प्रतिष्ठित नागरिकांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ऑक्सिजन पार्क तयार करून पर्यावरण विषयी जनजागृती करणारे पर्यावरण मित्र सारडेचे नागेंद्र परशुराम म्हात्रे ,किर्तन व अध्यात्मिक सेवेतून प्रबोधन करणारे सोनारीचे नारायण तांडेल आणि मेल फिमेल व्हाईस सिंगर म्हणून रसिक वर्गाचे मनोरंजन करणारे चिरनेरचे मोहन फुंडेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास रायगड भूषण प्रा.एल बी पाटील,मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्रीरामचंद्र म्हात्रे,पत्रकार घनशाम कडू, पत्रकार विठ्ठल ममताबादे, राधाताई बीस्ट, अनिता शिवकर, नरेश पाटील, दत्ताराम नीलवर्ण, सुरेश भोईर, तानाजी गायकवाड,अनंत पाटील, भिकाजी गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले तर आभारप्रदर्शनाचे काम जेष्ठ कवी हेमंत पाटील यांनी केले.