शालेय विद्यार्थ्यांसाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज!

संगमेश्वर दि. १३ : प्रत्येक व्यक्तीच्या विशेषत: मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी निरोगी पोषण ही सर्वात मोठी गरज असून, अशा परिस्थितीत लोकांना संतुलित आणि पौष्टिक आहाराचे फायदे आणि गरजे बद्दल, निरोगी, तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहाराचा अवलंब करण्यासाठी केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे एक ते सात सप्टेंबर या कालावधीत. ” प्रधानमंत्री राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहांत” केला जातो. याला अनुसरून जिल्हा परिषद शाळा गोळवली टप्पा तालुका संगमेश्वर या शाळेत या सप्ताहाचे महत्व व त्याची जनजागृती व्हावी अशा उदात्त हेतूने सदर सप्ताहानुसार शाळा स्तरावर पालक, शालेय पोषण आहार योजने अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्यासाठी तृणधान्यावर आधारित पाककृती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात महिला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. यामध्यें नाचणीची भाकर, भाजणीचे वडे, नाचणीचे गुलाबजाम, डाळ तांदूळ डोसा, रवा रवोबऱ्याचे मोदक, भजी, उकडीचे मोदक, शंकरपाळी, घावणं, इडली, भारंगीची रान भाजी, पुरी, रवा लाडू, शेवयाची खीर, गुलाबजाम, तांदळाची खीर, गाजर हलवा, कोथिंबीर वडी इत्यादी पाककृतीत पदार्थांचा समावेश होता.

मुलांच्या योग्य शारीरिक आणि मानसिक विकासासाठी बालवयात योग्य पोषण होण्यासाठी शालेय पोषण आहार योजने प्रमाणे आपापल्या घरीही पालकांनी आहाराची व पाककृतीची काळजी घ्यावीच. गरोदर महिलांच्या कुटुंबात अधिक काळजी घेण्याची गरज असून अज्ञान, उपलब्धतेचा अभाव व इतर कारणांनी कुपोषण समस्या दिसून येते. तरी आपण आहार व पोषण याबाबत जागरूकता ठेवावी, असे शाळेच्या मुख्याध्यापिका श्वेता खातू यांनी सुचित केले.
या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना किंजळकर,अंगणवाडी सेविका सविता पोमेंडकर,शिक्षिका सारीका सांगळे, स्वयंपाकी प्राची पानवलकर, व इतर महिला पालक उपस्थित होत्या.