महाराष्ट्र शासनाकडून कलाकारांना ५००० रुपये मानधन!

- राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : संपूर्णपणे कला-साहित्य या क्षेत्राशी निगडीत, त्यावर त्यांची उपजिविका अवलंबून लाभार्थी कलावंतांना राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेंतर्गत दरमहा रु.5 हजार मानधन राज्य शासनामार्फत दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://aaplesarkar.mahaonline.gov.in या लिंकवर आपले सरकार पोर्टलवर दि. 31 जुलै पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
यासाठीच्या अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड,उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक तपशील- बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड, अपंगत्वाचा दाखला (लागू असल्यास), राज्य/केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारसपत्र (लागू असल्यास), विविध पुरावे जोडणे आवश्यक आहे.
ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहेत. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्षे) ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षेआहे. ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा/परितक्त्या/दिव्यांग कलाकारांना प्राधान्य राहील. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६००००/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे, असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र, सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.
राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील साहित्यिक व कलावंतांनी संकेतस्थळाचा वापर करुन आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन सदस्य सचिव ज्येष्ठ कलाकार मानधन समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) यांच्यावतीने करण्यात येत आहे.