महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल साई मंदिरतर्फे सन्मान

उरण (विठ्ठल ममताबादे ) : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नुकतीच जगभ्रमंती केली. जगात सात खंड आहेत. त्या सातही खंडांचा त्यांनी नुकताच प्रवास पूर्ण केला आहे.
आगरी समाजात जगभ्रमंती करणारे महेंद्रशेठ घरत हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी वहाळ येथील साई मंदिरात अन्नदान करतात. त्यामुळे अनिल घरत आणि साधना घरत या दाम्पत्याला साईबाबांचे मंगलस्नान करण्याची संधी महेंद्रशेठ घरत यांनी दिली. महेंद्रशेठ घरत गुरुवारी न चुकता वहाळ येथील साई मंदिरात दर्शनासाठी जातात. ते गुरुवारी (या. १२) दर्शनासाठी गेले असताना साई मंदिरचे संस्थापक-अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी महेंद्रशेठ घरत यांचा जगभ्रमंती केल्याबद्दल यथोचित सत्कार केला.
यावेळी मढवी गुरुजी यांनी महेंद्रशेठ घरत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी ‘कलासागर’ फेम श्रीकांत मुंबईकर यांच्या ‘साई श्रद्धा’ या युट्यूब वाहिनीचे उदघाटन महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते झाले. यावेळी मढवी गुरुजी, माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील, अनंत पाटील, विश्वास पाटील आणि साई मंदिर व्यवस्थापनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव येथील जय गणेश प्रासादिक महिला भजन मंडळाच्या गायिका कलाश्री भोईर यांनी उत्तमोत्तम भजन सादर करून साईभक्तांची मने जिंकली.





