महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव

- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार
उरण (विठ्ठल ममताबादे ) : सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन करण्यात आला. हा गौरव समारंभ
सातारा-कराड येथे शुक्रवारी (दि. २५) झाला. मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठान, कराड यांच्यातर्फे कामगार, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याने मानपत्र, संविधानाची प्रत, शाल, पुष्पगुच्छ देऊन महेंद्रशेठ घरत यांना गौरविण्यात आले.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “सामाजिक क्षेत्रांत पैसे खर्च करणारे कमी झालेत; पण महेंद्रशेठ सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रांत मदत करण्यात अव्वल आहेत ही उल्लेखनीय बाब आहे.”सत्काराला उत्तर देताना कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले की,शेलघर येथे असणारा माझा ‘सुखकर्ता’ बंगला हे एक मंदिर आहे, तेथे आलेला कुणीही दीनदुबळा, गरजू रिकाम्या हाताने परत जाणार नाही याची काळजी मी घेतो. कोरोना काळात मी स्वतःचा जीव धोक्यात घालून आदिवासी पाड्यांवर अन्न-धान्य पोहचवले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचे काम केले, सध्या वर्षाला तीन-चारशे गरजवंत तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम करतोय.आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगारांचे नेतृत्व करीत असताना आयओएल, आयटीएफ या जागतिक पातळीवरील कामगारांच्या संघटनेत ठोस भूमिका घेऊन काम करतोय. मी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकल्यामुळेच आजपर्यंतची वाटचाल करू शकलो, त्यामुळेच आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्याची दानत माझ्यात आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार जगतोय आणि अमलात आणतोय. राज्यात मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानसारख्या अनेक संस्था चांगले काम करीत आहेत, त्यांना सढळ हस्ते मदत करतो, ते मी माझे कर्तव्य समजतो.”
यावेळी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी म्हणाले, महेंद्रशेठ घरत हे ग्रेट व्यक्तिमत्त्व आहेत, मी गेली अनेक वर्षे खेड्यापाड्यांत काम करतोय, माझी धावपळ पाहून महेंद्रशेठ घरत यांनी मला २५ लाखांची गाडी भेट दिली. महेंद्रशेठ घरत हे ना आमदार, ना खासदार; परंतु त्यांचे काम मात्र दमदार, हे मी अभिमानाने सांगू शकतो. कारण पायाला भिंगरी लावल्यागत त्यांचा दिनक्रम असतो. राजकारणात हजारो आहेत, पण अंत:करणापासून मदत, दान करणारे महेंद्रशेठ घरतच आहेत, हे मी मला आलेल्या अनुभवातून छातीठोकपणे सांगू शकतो.
महेंद्रशेठ घरत हे पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी कृष्णा-कोयनेच्या संगमावर असलेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर शुक्रवारी गेले होते तेथे यशवंतराव चव्हाण यांना वंदन करूनच ते पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले. समाधी स्थळ पाहिल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले. येथील समाधी स्थळाचे वैशिष्ट्य म्हणजे वटवाघळांचे जंगल आहे की काय, असे तेथील परिसरात चित्र दिसते. तेथे असणाऱ्या झाडांना पाने कमी आणि वटवाघळेच अधिक असल्याचे पाहायला मिळते.
यावेळी मुक्ता सामाजिक विकास प्रतिष्ठानला महेंद्रशेठ घरत यांनी २५ हजारांची मदत केली. संस्थेचे अध्यक्ष संजय तडाके यांनी ती स्वीकारली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. ॲड. संभाजी मोहिते, भानुदास माळी, अशोकराव थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.