मांडवी एक्सप्रेस झाली २६ वर्षांची!

- रेल्वेप्रेमींकडून कोकणवासीयांच्या लाडक्या मांडवी एक्सप्रेसचा वाढदिवस साजरा!
मुंबई : कोकणवासीयांची लाडकी तसेच रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई- मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.

गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून, २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी,२०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.
रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
कोकणातून धावणाऱ्या मांडवी एक्सप्रेस चा वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.
यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले.
यासाठी श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.