मुस्लिम दांपत्याने केले गरीब हिंदू मुलीचे कन्यादान!

- चिपळूणमधील आदर्श विवाह सोहळा
चिपळूण : सध्या भारतामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य बिघडण्याच काम काही काही विघ्नसंतुष्ट लोकांकडून सुरू आहे. मात्र चिपळूणमध्ये एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. शहरातील गोवळकोट येथे राहणाऱ्या इमरान सय्यद यांनी स्वतःच्या घरी कामाला असलेल्या हिंदू मुलीचे लग्न हिंदू संस्कृती प्रमाणे स्वखर्चाने लावून दिले.
लहानपणापासून आई-वडील नसलेली प्रतिभा ही इमरान सय्यद याच्या घरी राहायला होती. घरकाम करता करता ती इमरानच्या घरातली एक सदस्य बनली. सोळा वर्ष स्वतःच्या घरी राहिलेल्या या बहिणीसमान मुलीचा विवाह हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याने आज लावून दिला. तिच्यासाठी अनुकूल वर शोधून त्याची घरची परिस्थिती तपासून हा विवाह ठरला. इमरान सय्यद याचे संपूर्ण कुटुंब या विवाह सोहळ्यात सामील झाले. इतकेच नव्हे तर लग्नासाठी लागणारे दागिने, आहेर, संसार उपयोगी भांडी, अशा अनेक गोष्टी भेट देऊन त्यांनी एक प्रकारे कर्तव्य पार पाडले. गोवळकोटमधील राहणाऱ्या या तरुणाने एक वेगळा आदर्श घडवून दिला. इम्रान सय्यद या दांपत्याने या मुलीचे कन्यादान केले. तसेच लग्नाचा संपूर्ण खर्च इमरानने केला.