युवा प्रेरणा कट्टातर्फे इको फ्रेंडली घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन

दापोली : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या ‘युवा प्रेरणा कट्टा’ मार्फत गेल्या ३ वर्षांपासून पर्यावरणस्नेही बाप्पा सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी देखील ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपाची असून, नोंदणी मोफत असून online करावयाची आहे.
पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि गणेशभक्तांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ही स्पर्धा आयोजित केली आहे. बाप्पाची मूर्ती आणि सजावट दोन्हीही इको फ्रेंडली असावे आणि सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू भारतीय बनावटीच्याच असाव्यात असे आयोजकांनी स्पष्ट नमूद केले आहे. या स्पर्धेत भाग घेताना २ फोटो आणि थोडक्यात माहिती upload करावयाची आहे त्यासाठी https://mahajantrust.in/ganpati-contest
या लिंकवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
स्पर्धक दि. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ पर्यंत स्पर्धेत सहभाग नोंदवू शकतात. तद्नंतर याचे परीक्षण तज्ञ मार्गदर्शक करणार असून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि आवश्यक असल्यास उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात येतील अशी माहिती स्पर्धेच्या संयोजक श्वेता बापट दाबके यांनी दिली आहे.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीप्रीती वैद्य, संदीप गरंडे, श्रेयस जोशी , वेदांग शितूत, सुमेध करमरकर, ऋतिक यादव डॉ. रविकांत पवार, कौस्तुभ दाबके, श्वेता दाबके,नचिकेत बेहरे , गौरी खरे, गौरी खोत आणि संपूर्ण युवा टीम मेहनत घेत असल्याचे प्रतिष्ठान उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी नमूद केले.
