रत्नागिरीचे संगीतकार अवधूत बाम यांचा कलाप्रवास उलगडणार दूरदर्शनवर!
रत्नागिरी : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर ९ जुलै रोजी ‘मैत्र हे शब्द सुरांचे’ या कार्यक्रमात संगीतकार अवधूत बाम यांचा कलाप्रवास बघायला मिळणार आहे. संगीतकार अवधूत बाम हे कोकणातील एकमेव ए ग्रेड संगीतकार असून त्यांची मुलाखत आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी या कार्यक्रमात प्रक्षेपित होणार आहेत. रविवार 9 जुलै रोजी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत प्रक्षेपित होणार आहे.
कोकणातील एकमेव ए ग्रेड संगीतकार होण्यापर्यंतचा अवधूत बाम यांचा प्रवास, दिग्गज गायक, वादक यांचं त्यांना मिळालेलं मार्गदर्शन त्यांचे गुरू इत्यादीबाबत दिलखुलास गप्पा या कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. बाम यांच्याशी हा संवाद साधणार आहेत सुप्रसिद्ध निवेदिका स्मिता गवाणकर.
या कार्यक्रमात अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेल्या विविधांगी गीतरचना त्यांचे शिष्य स्वप्निल गोरे आणि आसावरी निगुडकर सादर करणार आहेत. त्यांना कोरस अनुया बाम यांनी दिला असून युवा हार्मोनियम वादक श्रीरंग जोगळेकर यांची हार्मोनियम तर रत्नागिरीतील प्रसिद्ध तबला वादक हेरंब जोगळेकर तबला साथ करणार आहेत. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रविवार 16 जुलै रोजी सकाळी 10.00आणि संध्याकाळी 5.00 वाजता सह्याद्री वाहिनीवर होणार आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाचे निर्मता अमित कुमार तर सहायक महेंद्र जगताप हे आहेत.