रत्नागिरी ‘विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत’वर व्याख्यान

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत.
रत्नागिरीत येत्या ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत पंधरावा कीर्तनसंध्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे महाभारताचा उत्तरार्ध या विषयावर आख्याविषयावर कीर्तने सादर करणार आहेत. महोत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी येत्या २० आणि २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे यांची “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही दोन दिवसीय व्याख्यानमाला होणार आहे, अशी माहिती कीर्तनसंध्या परिवारातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला होणार आहे. महाभारतासारख्या अफाट ग्रंथाचे पाठज्ञान सर्वांना व्हावे, तो अधिक सोपा जावा, यासाठी ही व्याख्याने होणार आहेत. व्याख्याने सर्वांसाठी खुली आहेत.
धनंजय चितळे चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार आणि लेखक आहेत. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील त्यांची प्रवचने लोक आवर्जून ऐकतात. रत्नागिरीत त्यांनी ‘वंदे मातरम्’ गीताविषयी व्याख्यान दिले होते. चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचे ते कार्याध्यक्ष आहेत. ते या संस्थेशी संबंधित विविध कार्यक्रमांमध्ये आणि व्याख्यानांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात. त्यांच्या रत्नागिरीतील व्याख्यानांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




