राज्यातील मानाची कै. मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धा २५ ऑगस्टपासून
रत्नागिरी : तरुणाईच्या परखड विचारांना व्यासपीठ मिळवून देणारी आणि गत ४० वर्षे राज्याच्या कानकोपऱ्यात नावलौकिक मिळविलेली मानाची ४१ वी कै. मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दिनांक २५ व शनिवार दिनांक २६ ऑगस्ट या दोन दिवसात एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात होणार आहे. नवनिर्माण शिक्षण संस्था आयोजित या स्पर्धेत राज्याच्या कानकोपऱ्यातून विद्यार्थी वक्ते सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्त्यांनी आपल्या जाज्वल्य विचारांनी गाजवलेली ही वक्तृत्व स्पर्धा तीन गटात होणार आहे. त्यासाठी पुढील गटनिहाय विषय देण्यात आले आहेत. १)माध्यमिक गट – मराठी माध्यम (जिल्हास्तरीय) – भारताची चांद्रयान भरारी, अभासी चलन आणि मी, राजमाता जिजाऊ – संस्कार आईचे, माझे आदर्श. २)कनिष्ठ महाविद्यालयीन गट (जिल्हास्तरीय) -निर्भय भारत आणि युवक, जन विस्फोटाच्या कठड्यावर भारत!, नैतिकतेचे आदर्श – प्रा. मधू दंडवते, नवे शैक्षणिक धोरण आणि पारंपरिक शिक्षण. ३) वरिष्ठ महाविद्यालयीन गट (राज्यस्तरीय)- चाणक्य कुटनिती आणि वर्तमान, ग्रीन ऊर्जा इंधन आणि अर्थकारण,आजच्या साहित्यातील वर्तमानाचे पडसाद?, कृत्रिम बुद्धिमत्तेचे मानवी बुद्धीमत्तेवर अधिराज्य!. यापैकी एका विषयावर स्पर्धेकांना गटनिहाय बोलावे लागणार आहे.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील अनुक्रमे तीन विजेत्यासह दोन उत्तेजनार्थ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वरिष्ठ आणि कनिष्ठ गटासाठी विषय सादरीकरणासाठी ७ मिनिटे तर माध्यमिक
गटासाठी ५ मिनिटे वेळ राहिल, उत्स्फूर्त विषयासाठी ३ मिनिटे वेळ दिला जाणार आहे.