वट पौर्णिमा : महिला अस्मिता दिन
वट पौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे तर हिंदू पतीव्रतेंच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग सदाचार शालीनता पतीव्रता ह्या गुणांची स्वामीनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्री कडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वट पौर्णिमा!
आज तसा जास्तच उशिर झाला होता. स्त्यावर एका ठिकाणी बायकांची खुप गर्दी होती बघतो तर फणसांचा ढीग पडला होता आणि बायका खरेदी करायला जणू तुटून पडल्या होत्या, ते पाहून मला आठवण झाली अरे वट-पौर्णिमा परवा शुक्रवारी ना? आमच्या सावित्रीनं गेल्या आठवड्यात तसी तंंबीच दिली होती की थोडी सुट्टी काढून घरी या वट-पौर्णिमा आहे.
तर या वट-पौर्णिमेचा सण म्हणजे सत्यवान सावित्री विषयी सर्वांना माहीतच आहे.
अश्वपती नावाच्या राज्याला मूल -बाळ नव्हते तो निपुत्रीक होता त्याने तप करून सुर्याला प्रसन्न केले पुत्रवंत होण्याचा वरदान मागितले. सुर्याने मुलगी होईल असा आशिर्वाद दिला,
पण आजच्या माणसांप्रमाणे त्याने हट्ट नाही केला की मला मुलगाच पाहिजे म्हणून ,
सूर्याच्या वरामुळे राजाला मुलगी झाली म्हणून नाव सावित्री.
सावित्री खूप हुशार, गुणी आणि सर्व उपनिषदात निपुण होती त्याला आपल्या मुलीवर पूर्ण विश्वास होता म्हणूनच राजाने तीला तीच्या मणा सारखा पती निवडण्याचे स्वातंत्र्य दिले.
तिने कित्येक राजकुमारातुन द्युमत्सेन राजाचा मुलगा सत्यवानाची निवड केली पण त्याच वेळी सत्यवानाचे वडिल राजा द्युमत्सेनाचे काही कारणाने राजवैभव गेले आणि दोन्ही राजा -राणी अंध झाली,पण तिने आपला निर्णय बदलला नाही स्वतः नारदाने तिला समजावले की सावित्री हा सत्यवान कितीही चांगला गुणवान असला तरी त्याचे आयुष्य फक्त १ वर्षेच आहे पण तिने सांगितले जे व्हायचे होते ते झाले आता काही बदल होणार नाही, हिंदू संस्कृती नुसार एकदा कुणाला पती म्हणून वरले मग दुसर्याचा विचारही करणे व्यभिचार.
तर असी ही सावित्री अटल, अढळ, सुलक्षणी पतीव्रता स्त्री.
लग्नानंतर राजवैभव गेल्यामुळे अगदी कैवल्य नेसुन पती सोबत अरण्यात अगदी सुखाने राहायला गेली पण आज-कालच्या मुलींप्रमाणे विचारही केला नाही की मी माहेरी किती वैभवात होते. पालापाचोळ्यांच्या पर्णकुटीत तिने स्वर्ग अनुभवला ,पती हाच परमेश्वर हाच सिद्धांत, सत्यवानाच्या अंतकाळाचा दिवस एक -एक करून जवळ येत होता ,आणि तो काळ दिवस उजाडला,नित्यदिना प्रमाणे अग्नीहोत्रासाठी सुकी लाकडे आणायला जंगलात निघाला पण आज सावित्रीने पतीसोबत जाण्याची सासू -सासर्याकडे याचना केली. त्यांच्या परवानगीने ती जंगलात गेली. एका झाडावरील सुके लाकूड काढताना त्याला भोवळ आली तो कसाबसा खाली उतरला सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून निपचिप पडला सावित्री आपल्या पदराने त्याला वारा घालू लागली , इतक्यात तिच्या समोर तेजस्वी कांतीचा रंगाने काळा महाभयंकर देव-पुरुष हातात फाशीचा दोर घेऊन रेड्यावर स्वार असा प्रकट झाला त्याच्या फासाच्या एका टोकाला सत्यवानाच्या पायाचा अंगठा अडकवून नेऊ पाहत होता. सावित्रीने न डगमगता प्रश्न केला “हे देवा आपण कोण आहात आणि माझ्या पती ला आपण कुठे घेऊन निघालात ” यम म्हणाला हे सावित्री मी काळदेव यमराज. तुझ्या पतीचा जीवनकाळ संपला आहे. तुझ्या चारित्र्यशील तेज्यासमोर माझे यमदूत येऊ शकत नाहीत म्हणून मलाच स्वतः यावं लागलं इतक बोलुन यमराज सत्यवानाचे प्राण हरण करून दक्षिणेकडे निघाले पण सावित्रीने त्यांची पाठ सोडली नाही यमाने तिला खूप समजावले पण व्यर्थ. त्याने सांगितले पतीचे प्राण सोडून काय पण माग तिने आपल्या सासू -सासऱ्यांचे गेलेले वैभव आणि डोळे मागितले यमाने हे सर्व देऊन सुद्धा तिने यमाची पाठ नाही सोडली. मग अजून काय माग म्हटल्यावर तिने आपल्या पित्याला पुत्र प्राप्तीचा वर मागितला ते देऊन सुद्धा ती थांबली नाही तेव्हा हताशपणे यम म्हणाले की, शेवटचा वर माग, तेव्हा सावित्री म्हणाली देवा दोन्ही कुळांसाठी मी मागितले आता माझ्यासाठी पूत्रवतीचा वर द्यावा यम घाई-घाईनं तथास्तु म्हणून पुढं जाऊ लागले पण चार पावले चालून तिथेच थबकले. त्याची चुक त्यांना कळाळी पतीव्रता सावित्रीला पतीशिवाय मुले कशी होतील ते तिच्या चातुर्यावर प्रसन्न झाले आणि सत्यवानाला ४०० वर्ष आयुष्य व १०० पुत्र प्राप्तीचा आशिर्वाद दिला तो दिवस पौर्णिमेचा होता आणि ते झाड वडाचे, म्हणून स्त्रीया ह्या दिवशी आपल्या पतीच्या दिर्घायुषासाठी हा उपवास करतात
भगिनीनो आपले अस्तित्व ओळखा. तुम्ही या भारतभुमीच्या पुत्री आहात या मातीतुन अनेक असामान्य शक्ती जन्माला आल्यात वीरमाता जिजाबाई ‘विरांगणा राणी लक्ष्मीबाई ,पतीव्रता सावित्री ,सत्वशिल अनुसया, त्यागमुर्ति सिता नावे घेऊ तितकी कमी आहेत.
नारी कधीच अबला नव्हती समाजातील कोणतीही ताकद तिला कमजोर करु शकत नाही. तिला एकच गोष्ट कमजोर करु शकते ते म्हणजे तिच आत्मबल ते आत्मबल खचऊ नका फक्त योग्य आचरण करा आणि त्या शक्तींचा आदर्श समोर ठेवा,
ज्या माय-बहिणी या वट-पौर्णिमेचा उपवास करणार आहेत त्यांना माझं इतकेच सांगन आहे जर तुम्ही तिचा उपवास करता तर तिच्या प्रमाणे आचरण करा, सावित्रीने राजवैभव गेल्यानंतरही झोपडीत राहून आपल्या अंध सासू- सासर्याची सेवा केली आजकालच्या सूनांप्रमाणे पतीला त्याच्या आई-वडिलांपासुन अलग नाही केले, सावित्रीने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पतीचे गेलेले प्राण आणले पण आपण प्राण नाही पण आपल्या चारित्र्याचे रक्षण जरूर करू शकता, तुम्ही कुळाची मानमर्यादा, सासरच्या लोकांचा मानसन्मान आणि नवर्याची मर्यादा राखली तर तो खरा उपवास ठरेल.
तर अशी होती सत्वशिल पतीव्रता हूशार सावित्री तिने दोन्ही कुळाचा उद्धार केला ,आणि त्याच श्रेय जाते ते तिच्या पित्याला त्याने मुलगाच पाहिजे असा विचार केला असता तर सावित्री जन्मलीच नसती पण आजकाल कित्येक सावित्र्या पोटातच मारल्या जातात, कुळाचा उद्धार कराण्यासाठी मुलगाच होणे जरुरी नाही, आपल्या मुलीला सावित्री सारखे आचरण चांगले संस्कार द्या.
म्हणून मुलगी वाचवा मुलगी जगवा आणि तिला चांगली शिकवा.
उगाच नाही म्हणत,
मुलगी शिकली प्रगती झाली!