विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श ठेवावा : चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

येथील दामले विद्यालयात चैतन्य संवाद या कीर्तनसंध्या परिवाराच्या पुढाकाराने झालेल्या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. सुमारे ७५० विद्यार्थ्यांसमोर त्यांनी रामायणातील मारुतीच्या वेगवेगळ्या कथा सांगून विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श का आणि कसा ठेवावा, हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. मारुतीच्या बाललीलांपासून लंकादहनापर्यंत विविध गोष्टींचा त्यामध्ये समावेश होता. लहानपणी मारुतीने ऋषींना त्रास दिल्यामुळे. त्याला दुर्वास ऋषींनी शाप दिला होता. त्याला आपल्यामधील क्षमतांचे स्मरण होणार नाही, असा तो शाप होता. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला लंकेत शोधायला जाण्याच्या वेळी जांबुवंताने मारुतीला त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांचे स्मरण करून दिले. त्यामुळे तो १०० योजने दूर असलेल्या लंकेत उड्डाण करून जाऊ शकला. तेथे गेल्यानंतर त्याने रावणाशी होणाऱ्या रामाच्या युद्धाची शक्यता लक्षात घेऊन लंकेतील विविध स्थळे पाहून घेतली. सैन्याच्या छावण्या कुठे उभारता येतील, त्यांच्या भोजनाची व्यवस्था कोठे करता येऊ शकेल, याचबरोबर लंकेमधील वेगवेगळ्या इमारती, राजप्रासाद अशा विविध ठिकाणांचा अभ्यास त्याने केला. त्याचा उपयोग तो पुन्हा आल्यानंतर रामाने रावणाशी युद्ध करताना झाला. त्यामुळे रावण पराभूत झाला. एकाग्रतेने, चौकसपणे आणि अभ्यासपूर्वक त्याने हे सर्व केल्यामुळे त्याचे नाव आजही घेतले जाते. म्हणूनच त्याचा आदर्श प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
मुलांनी आपल्या आई-वडिलांचे ऐकले पाहिजे, असे सांगून श्री. आफळेबुवा म्हणाले, मुलांनी शिक्षकांचे ऐकले पाहिजे, कोणालाही त्रास देऊ नये, दररोज सूर्यनमस्कारासारखा व्यायाम केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यातून सुदृढ झालेल्या शरीराचा उपयोग स्वतःबरोबरच राष्ट्रकार्यासाठी केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुख्याध्यापक भगवान मोटे यांनी स्वागत केले. यावेळी कीर्तनसंध्या परिवाराचे अध्यक्ष अवधूत जोशी, नितीन नाफड, उमेश आंबर्डेकर, निबंध कानिटकर आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते.





