शमी आणि शमी विघ्नेश पुजनाचा दिवस : विजयादशमी

भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा विजिगीषू वृत्तीचे प्रतीक असणारा वैभवशाली दिवस म्हणजे विजयादशमी.
भारतीय संस्कृतीमध्ये आणि त्यातही विशेषत्वाने जाणवते त्या संप्रदायात या दिवशी शमीच्या पूजनाचे विशेष महत्त्व असते.
और्व ऋषींची कन्या शमिका आणि धौम्य ऋषींचे सुपुत्र मंदार यांना महर्षी भृशुंडी ऋषींच्या शापामुळे वृक्षत्व प्राप्त झाले.
पुढे त्यांच्या पित्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झालेल्या भगवान गणेशांनी या दोन्ही वृक्षांना स्वतःच्या पूजेत अत्यंत महत्त्वाचे स्थान प्रदान केले.
दूर्वे नंतर भगवान गणेशांना सर्वाधिक प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे शमी आणि मंदार.
विजयादशमी हा शमीच्या पूजनाचा विशेष काळ. शमीच्या मुळाशी असणाऱ्या श्रीगणेशांना शमीविघ्नेश असे म्हणतात.
श्री शमी विघ्नेशाचा सगळ्यात विशाल विग्रह आहे श्रीक्षेत्र अदोष येथे. सध्या आपण या स्थळाला अदासा या नावाने ओळखतो.
महाराज बली चे नियंत्रण करण्याच्या पूर्वी भगवान श्री वामन यांनी आपले पिताश्री महर्षी कश्यप यांच्या आज्ञेवरून याच स्थानावर श्री गणेश आराधना केल्याचे श्रीमुद्गल पुराणात वर्णन केलेले आहे.
भगवान श्री वामनांच्या सह भगवान श्री रामचंद्र तथा पांडवांच्या विजय यात्रेत देखील शमीचे स्थान सर्वश्रुत आहेच.
अग्निगर्भा असणाऱ्या शमीला तेजाची आणि पराक्रमाची प्रार्थना करण्याचा हा दिवस.
त्या तेजाच्या, ज्ञानाच्या आधारावर आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर विजय मिळावा यासाठी भगवान शमी विघ्नेशांना प्रार्थना करण्याचा हा दिवस.
जय शमी विघ्नेश !