शाळेमध्ये मिळणारे शिक्षण आणि संस्कार हे प्रगतीचे खरे टप्पे : प्रशांत यादव

संगमेश्वर दि. १४ : प्राथमिक शाळा असो अथवा माध्यमिक या शाळांमधून मिळणारे शिक्षण आणि गुरुजनांकडून होणारे संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे खरे टप्पे आहेत. शाळेमध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःला सर्व टप्प्यांवर चौकस करणे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे ज्ञानाने माणसाला समृद्ध बनवते. या समृद्धीच्या जोरावरच भविष्यातील प्रगती अवलंबून असल्याचे प्रतिपादन चिपळूण येथील वशिष्ठ डेअरीचे अध्यक्ष आणि चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत यादव हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक शकील सावंत, माजी बांधकाम सभापती विजय देसाई, संस्था अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत यादव पुढे म्हणाले की, सध्या कृषी क्षेत्रामध्ये करियर करण्याची खूप मोठी संधी आहे. वशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून आम्ही नुकताच कृषी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाला असंख्य शाळांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्राशी निगडित विविध भागांची ओळख करून दिली, ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे. असंख्य शाळा आपल्या सहली घेऊन हा कृषी महोत्सव पाहण्यासाठी आल्या होत्या. संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील कार्य खूप मोठे आहे. या संस्थेला आपले नेहमीच सहकार्य असेल, असे आश्वासन यादव यांनी यावेळी दिले.
रत्नागिरी येथील उद्योजक शकील सावंत आपल्या मनोगतात म्हणाले की, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे , हे नक्की केले पाहिजे. सध्या शिक्षणाची विविध तंत्र उपलब्ध आहेत, विद्यार्थ्यांनी याचा आपल्या शैक्षणिक प्रवासात वापर करणे ही काळाची गरज आहे असे सावंत यांनी स्पष्ट केले.
संस्थेतर्फे प्रशांत यादव आणि शकील सावंत यांचा तसेच व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी काही काळ विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे आणि सहकारी शिक्षक – शिक्षिका यांनी केले.