शासकीय रेखाकला परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग घेणार
देवरुख कला महाविद्यालयाचा उपक्रम
पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्वावर १० शाळांत उपक्रम
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात ४० पेक्षा अधिक माध्यमिक विद्यालये आहेत . यातील केवळ ०५ माध्यमिक विद्यालयांमध्ये कलाशिक्षक उपलब्ध आहेत . उर्वरित सर्व शाळात कलाशिक्षक उपलब्ध नसल्याने कलाविषयाकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब देवरुख कला महाविद्यालयाच्या लक्षात आली असल्याने यावर उपाय म्हणून पहिल्या टप्प्यात १० माध्यमिक शाळांची निवड करुन तेथील विद्यार्थ्यांना शासकीय रेखाकला परीक्षांबाबत मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन देवरुख कला महाविद्यालयाचे प्राचार्य रणजित मराठे यांनी केले .
देवरुख कला महाविद्यालयात संगमेश्वर तालुक्यातील कलाशिक्षकांची ” कलेपुढील आव्हाने आणि अडचणी ” या विषयावर चर्चा करण्यासाठी नुकतीच एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करताना मराठे हे बोलत होते . यावेळी बैठकीला देवरुख कला महाविद्यालयाचे प्राध्यापक विक्रम परांजपे , अवधूत पोटफोडे , सुयोग पेंढारकर, स्वप्नील बडवे , दिशांत सुरे, सौ. दीप्ती भिडे , तसेच जलरंग चित्रकार विष्णू परीट , सोमनाथ कोष्टी , प्रदीप शिवगण, सूरज मोहिते, ऋतुराज जाधव आदि कलाशिक्षक उपस्थित होते.
कलाशिक्षकांच्या वतीने विविध अडचणी मांडण्यात आल्या . यामध्ये शासकीय रेखाकला परीक्षांसाठी यापूर्वी असणारे मुक्त हस्त चित्र, निसर्ग चित्र हे विषय परत सुरु करावेत, ज्या शाळेत कलाशिक्षक उपलब्ध आहेत अशा शाळेत नववी – दहावी या वर्गांसाठी चित्रकला आणि रंगकाम हा विषय प्राधान्याने सुरु करावा . ज्या माध्यमिक शाळेत कलाशिक्षक नाहीत अशा शाळांमध्ये देवरुख कला महाविद्यालयाने आपल्या शाळेतील प्राध्यापक आणि कला विद्यार्थी यांना परीक्षेपूर्वी किमान तीन वेळा शाळांमधून पाठवून शासकीय रेखाकला परीक्षेसाठी प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करावे . या प्रयत्नांमुळे रेखाकला परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकेल आणि यातील काही विद्यार्थी पुढे उच्च कलाशिक्षण घेण्यास प्रवृत्त होवू शकतील .
प्राचार्य रणजित मराठे यांनी या सर्व अडचणी आपण २४ जून रोजी सह्याद्री कला महाविद्यालय सावर्डे येथे येणाऱ्या राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविणाऱ्या समिती समोर लिखित स्वरुपात देणार असल्याचे स्पष्ट केले . देवरुख येथे बाळासाहेब पित्रे यांनी भव्य कला महाविद्यालय उभे करुन कोकणातील मुलांना कलाशिक्षणाची दारे खुली केली आहेत. येथे आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत . संस्था ठामपणे पाठीशी उभी आहे. अशावेळी माध्यमिक शाळांनी आपल्या प्रशालेतील कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज परिसर येथील चित्रे येथे दाखविण्यासाठी घेऊन यावे . या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन देवरुख कला महाविद्यालयात भरविण्याची आमाची तयारी असून आवश्यक त्यावेळी येथे अथवा शाळांमधून प्रात्यक्षिके दाखविण्याची आमची तयारी असल्याचे प्राचार्य रणजित मराठे यांनी स्पष्ट केले .
सुमारे अडीचतास सलग संपन्न झालेल्या या चर्चेत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले . अशाच प्रकारची चर्चा करण्यासाठी परत एकत्र येण्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले . प्राध्यापक अवधूत पोटफोडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.