महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती

शिक्षणातून डोक्यासह पोटाचाही विचार व्हावा : प्रा. मिलिंद जोशी

मांडकी–पालवण येथील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाचा समारोप

चिपळूण : आज विविध क्षेत्रात झपाट्याने बदल घडू लागला आहे. बदलत्या जगात केवळ बौद्धिक पाट्या टाकून उपयोग नाही. तरुणांच्या पोटाचा प्रश्न सुटला नाही, तर देश महासत्ता होण्याची स्वप्ने फोल ठरतील. त्यामुळे शिक्षण देताना डोक्याबरोबरच पोटाचाही विचार झाला पाहिजे, अशी ठाम आणि रोखठोक भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी मांडली.

शिक्षण, कृषी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा त्रिवेणी संगम असल्याचे सांगत मांडकी-पालवण येथील साहित्य संमेलनाचेही विशेष कौतुक केले.

तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप रविवारी उत्साहात झाला.

रविवार, १५ फेब्रुवारी रोजी ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’, ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयावर परिसंवाद पार पडले. ग्रामीण साहित्यिक तसेच कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई आणि डॉ. अकुश चोरमुले यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या शेतीतील प्रयोगशीलतेच्या आणि यशस्वी वाटचालीच्या कथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्या. डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत दैनिक सकाळचे माजी संपादक यमाजी पालकर यांनी डॉ. तानाजीराव चोरगे यांची मुलाखत घेत त्यांच्या जीवनसंघर्षाचा प्रवास उलगडला. चोरगे यांनी विविध विषयांवर परखड भाष्य केले तर वेगवेगळ्या प्रश्नाची मिश्किल शैलीत उत्तरे देत सभागृहाला पोट धरून हसायलाही लावले. त्यांनी आपल्या मुलाखतीत आतापर्यंत स्वतःची ४९ पुस्तके प्रकाशित झाल्याचे सांगत“मी माझं गाव शोधतोय” या विषयावर ५० वे पुस्तक लिहीत असल्याची माहितीही दिली. तसेच साहित्य संमेलनाचा उद्देश यशस्वी झाल्याबद्दल देखील त्यांनी समाधानही व्यक्त केले.

समारोप कार्यक्रमात पुढे प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार विषयक संमेलने स्वतंत्रपणे होतात; मात्र या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार करणारे हे संमेलन महत्त्वाची पायरी ठरले आहे. मराठी साहित्य, कथा–कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये सहकार क्षेत्राचे अनेकदा नकारात्मक चित्रण झाले असले, तरी संपूर्ण सहकार चळवळीची प्रतिमा कलुषित करणे योग्य नाही. ग्रामीण अर्थकारण बळकट करण्यात सहकार संस्थांचे मोलाचे योगदान आहे. ते पुढे म्हणाले, उच्च शिक्षणानंतरही बेकारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. केवळ पदवीधर तयार करून चालणार नाही; उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळात रूपांतर झाले पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचे मार्ग असले तरी परतफेडीच्या वेळी अतिवृष्टी, दुष्काळ, आजारपण, शिक्षण-लग्नखर्च अशा अडचणींमुळे ते कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा कारणीभूत नसून हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही मोठे कारण आहे. जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या यशोगाथा साहित्यामध्ये याव्यात, असेही त्यांनी नमूद केले. ज्ञानासोबत आत्मपरीक्षण हवे : आमदार शेखर निकम आमदार शेखर निकम म्हणाले, ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांची सांगड घातल्याशिवाय यश टिकत नाही. ज्ञान असेल तर आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल तर शिकण्याची तयारी राहते. तरुणांनी मेहनतीवर भर द्यावा आणि शॉर्टकटला थारा देऊ नये, असे त्यांनी आवाहन केले. संमेलनाचे प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे यांनी सहभागी साहित्यिक, मान्यवर आणि ग्रामस्थ असेच ज्यांनी ज्यांनी या संमेलनासाठी वेळ दिला त्या सर्वांचे आभार मानले. विशेष म्हणजे संमेलनासाठी निखिल चोरगे यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल आमदार शेखर निकम व उपस्थिती मान्यवर यांनीही त्यांचे खूप सारे कौतुक केले. या संमेलनात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्स यांना सुद्धा उत्तम प्रतिसाद लाभला. दोन महत्त्वाचे ठराव या संमेलनाच्या समारोपात संयोजन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी दोन महत्त्वाचे ठराव मांडले. यामध्ये कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी शासनाने तातडीने द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता संचमान्यता धोरण रद्द करून येथील मराठी शाळांना जिवदान द्यावे, असा ठरावही संमेलनात करण्यात आला.

या प्रसंगी ज्येष्ठ माजी आमदार पाशा पटेल, पद्मश्री पोपटराव पवार, सागर देशपांडे, कवी अरूण इंगवले, धीरज वाटेकर, राष्ट्रपाल सावंत, कैसर देसाई, सुरेश खापले, सौ. अंजली चोरगे, बाबूराव धोत्रे पाटील, अजय चव्हाण, संतोष गोणबरे, सुभाष लाड, डॉ. संकेत कदम, महेंद्र गावणंग, ज्ञानोबा बोकडे, सचिन तांबेकर, डॉ. शमिका चोरगे, रोशन मोहिरे, प्रा. प्रशांत इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण विकासाच्या त्रिवेणी संगमाची दिशा दाखवणारे हे संमेलन कोकणातील सामाजिक, साहित्यिक आणि कृषी क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरले.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button