श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेकडून संघर्ष नगर येथील बांधवांना फराळ वाटप

उरण (विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे विचार व कार्याचा प्रसार व प्रचार करणाऱ्या व विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गोरगरिबांना मदत करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण तर्फे दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी निमित्त संघर्ष नगर मधील बांधवांना फराळ वाटप करण्यात आले.
यंदा उरण तालुक्यातील मोरा रोड भवरा येथील मांगीरदेव संघर्षनगर येथील गोर गरीब बांधवांना दिवाळी फराळचे वाटप करण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुधीर मुंबईकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते गणेश अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते बाबू दुर्गन्ना, हणमंत पोतेनवरू, संजय गायकवाड, निकिता पाटील उपस्थित होते.

या कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केली. प्रस्तावनेत संस्थेचे कार्य, संस्था स्थापन करण्या पाठीमागचे उद्दिष्ट यांची माहिती दिली. उपस्थित प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते गणेश अधिकारी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था ही खरच समाजात उत्तम काम करीत असून गोर गरीब लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दिवाळी फराळ वाटप केला. संस्थेचे हे कार्य आदर्श व सर्वांना प्रेरणादायी आहे असे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते हणमंत पोतनवरू यांनी मत व्यक्त करताना सांगितले कि गेल्या ३५ वर्षात या ठिकाणी कोणीही आला नाही.कोणीही दिवाळी फराळ वाटप केले नाही. मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज संस्थेने पहिल्यांदा आम्हाला दिवाळी फराळ दिला. आज खरंच आम्हाला खूपच आनंद व समाधान वाटला. असे कार्यक्रम समाजात होत राहिले पाहिजे. वंचित शोषित घटकांना न्याय मिळाला पाहिजे. संस्था पुढे जाऊन खूपच प्रगती करेल असे मत व्यक्त केले. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करून संस्था नेहमी चांगले व लोकोपयोगी उपक्रम राबवित असते. संस्थेने आजपर्यंत अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. संस्था नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवून समाजात परिवर्तन घडविण्याचे कार्य करीत असल्याचे सांगितले. सर्वात शेवटी आभार कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी मानले. ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष रित्या या उपक्रमाला मदत केली, सहकार्य केले अशा सर्वांचा यावेळी आभार मानण्यात आले. दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमामुळे संघर्ष नगर मधील बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. उपस्थित सर्व नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या कार्याचे कौतुक करत सर्व पदाधिकारी सदस्यांचे त्यांनी आभार मानले.संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. एकंदरीत फराळ वाटप कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सल्लागार आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सचिव प्रेम म्हात्रे, उपाध्यक्ष हेमंत पवार,सल्लागार माधव म्हात्रे,समीर पाटील,सुविध म्हात्रे, ओमकार म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, साहिल म्हात्रे, प्रीती पाटील, वैशाली भगत, नितेश पवार,आकाश पवार,सुमित कोळी, हेमंत ठाकूर, जुगल कोळी, सुरज पवार, कुमार ठाकूर, अर्णव पाटील, रुद्र विठ्ठल ममताबादे तसेच इतर सर्व पदाधिकारी, सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.





