संगमेश्वरच्या पैसा फंड कलादालनाला दापोलीतील मान्यवरांची सदिच्छा भेट
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे प्रशालेच्या कला विभागाने कोविड काळात लॉकडाऊनच्या कालावधीत माजी विद्यार्थी आणि सन्मानीय देणगीदारांच्या सहकार्याने उभारलेल्या पैसा फंड कलादालनाला मंगळवारी श्री. प्रमोद सावंत संचालक विस्तार शिक्षण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, श्री. प्रदीप इप्ते ( निवृत्त बॅंक अधिकारी ), हरिश्चंद्र कोकमकर ( कुणबी सेवा संघ दापोली ), प्रभाकर तेरेकर, (सदस्य कुणबी सेवा संघ दापोली ), श्रीकृष्ण खातू निवृत्त मुख्याध्यापक धामणी ता. संगमेश्वर यांनी सदिच्छा भेट दिली .
प्रशालेतील कला विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले मान्यवरांनी पैसा फंडच्या कला विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ कलासाधना ‘ चित्रकला वार्षिक, शासकीय रेखाकला परीक्षा, अन्य बाह्य परीक्षा , कला ग्रंथालय, माजी विद्यार्थ्यांच्या कलाकृती , कलादालनातील सर्व कलाकृती आणि शिल्प पाहून सर्व कलाकारांचे खास कौतूक करुन शाळेला जोडून अशाप्रकारचे कलादालन आपण प्रथमच पहात असल्याचे मत व्यक्त केले .
कला विषयाचे अध्यापन अशाप्रकारे जीव ओतून आणि मन लावून करता येते याची प्रचिती आज आम्हाला पैसा फंड कलावर्ग आणि पैसा फंड कलादालन पाहून आल्याचे मत यावेळी प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले . धामणी येथील निवृत्त मुख्याध्यापक श्रीकृष्ण खातू यांच्या शिफारशीने आज या मान्यवरांनी पैसा फंड कलादालनाला भेट दिली. प्रशालेच्या कला विभागातर्फे दापोली येथील मान्यवरांना आणि श्रीकृष्ण खातू गुरुजी यांना धन्यवाद देवून आभार व्यक्त करण्यात आले .