संगमेश्वरमधील चालुक्यकालीन शिल्पसमृद्ध श्री कर्णेश्वर मंदिरात आजपासून किरणोत्सव !
संगमेश्वर दि. १४: पूर्वाभिमुख असलेल्या कर्णेश्वर मंदिरात वर्षातून दोन वेळा सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट शंकराच्या पिंडीवर येतात, किरणोत्सवाचा हा नयनरम्य देखावा पाहता येणं ही भाविकांसाठी , अभ्यासकांसाठी पर्वणी असते. गुरुवारी सकाळी ०७.०० वाजल्यापासून सुमारे १०-१२ मिनिटे हा नयनरम्य सोहळा आपण पाहू शकता , तेव्हा याची देही याची डोळा हा अनुपमेय सोहळा पाहण्यासाठी श्री क्षेत्र कर्णेश्वर, कसबा – संगमेश्वर येथे , उद्यापासून पुढील ३ दिवस सकाळी ०६.५५ वाजता भाविकांना किराणोत्सव पाहता येणार आहे.
पूर्व क्षितिजावर तेजोनिधी भास्कर प्रकट होतील. सुमारे ७ वाजेपर्यंत लालबुंद गोळा आकाशात दिसू लागेल आणि पुढच्या पाचच मिनिटांत श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवपिंडीवर आपल्या किरणांची मुक्तहस्ते उधळण करीत शंभू महादेवाना सोनेरी सचैल किरणांचे स्नान होईल. किरणोत्सव खगोल शास्त्र, स्थापत्य शास्त्र आणि धार्मिकता यांचा त्रिवेणी संगम प्रत्यक्ष अनुभव घेण्याजोगाच सोहळा आहे. सुमारे १० ते १२ मिनिटे हा सोहळा अनुभवता येणार आहे. शिवशंकरांना वंदन करून गगनराजाची पुढील वाटचाल सुरू होईल. मात्र, ही ५ मिनिटे प्रत्यक्ष डोळ्यात साठवण्यासारखीच असणार आहेत.
नंदीचे नतमस्तक होणे नयनरम्य
मार्च महिना सुरु होताच अगदी पहिल्या दिवसापासून सूर्योदय झाल्यानंतर आपण कर्णेश्वर मंदिरात थांबू लागले . आपण केलेल्या प्रतिक्षेचे फळ प्रथम १२ मार्च रोजी याची देही – याची डोळा पहायला मिळाले . मंदिराच्या प्रवेशद्वारातून पहिल्यांदा १२ मार्च रोजी सूर्यकिरणे आतमध्ये येण्यास सुरुवात झाली . मुख्य प्रवेशद्वारातून सभामंडपाच्या प्रवेशद्वारात , त्यानंतर हळूहळू शंभू महादेवांचे वाहन असलेल्या नंदीवर जेंव्हा सूर्यकिरणे पोहचली त्यावेळी पहायला मिळालेले दृश्य हे अक्षरशः भाग्यवंतालाच पहायला मिळते असे होते. नंदीवर सूर्यकिरण पडल्यानंतर नंदीची सावली मोठी झाली आणि तो जागेवरुन उठून शिवपिंडीवर नतमस्तक होण्यासाठी गेल्याचा नयनरम्य सोहळा समोर दिसत होता .
– गजेंद्र देशमुख
गेली अनेक वर्षे कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात मावळतीला जाणाऱ्या सूर्याने देवीचा किरणोत्सव होतो. कसबा येथील कर्णेश्वर मंदिरात मात्र उगवत्या सूर्याच्या किरणांनी हा उत्सव अनुभवता येणार आहे. अकराव्या शतकातील शिल्प समृद्ध अशा कर्णेश्वर मंदिरात हा अनुपमेय सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजता श्री क्षेत्र कर्णेश्वर कसबा संगमेश्वर येथे भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.