सह्याद्री कला महाविद्यालयातील कलाकारांच्या कुंचल्यातून मुंबईच्या सौंदर्यात भर!
भिंतींचे सुशोभीकरण ; मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम
संगमेश्वर : कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे असणारे सह्याद्री कला महाविद्यालय हे महाराष्ट्रातील एक अग्रणी कला महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. येथून गेल्या ३२ वर्षात अनेक विद्यार्थी कलाशिक्षण घेऊन बाहेर पडले. यातील बहुतेक विद्यार्थ्यांनी कलेच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला असताना येथे शिक्षण घेतलेले काही कलाकार गेले तीन महिने मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मोकळ्या भिंतींवर विविध चित्रे रेखाटून शहराचे सुशोभीकरण करण्याच्या कामात मग्न आहेत.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे सह्याद्री कला महाविद्यालय म्हणजे एक प्रयोगशील परिसर आहे . ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हे कला महाविद्यालय एका विशिष्ट उंचीवर नेवून ठेवले आहे. या कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवून सह्याद्री कला महाविद्यालयाचे नाव उंचावले असतानाच येथे रेखा आणि रंगकलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या कलाकार हेमंत सावंत, अमेय कोलते, मयुरेश खळे, प्रशांत आग्रे , किरण खापरे, प्रणित मोहिते, अल्पेश बंडबे, समीर घडशी यांना मुंबई महानगरपालिके कडून अंधेरी पूर्व विभाग, मेट्रो कारशेड या ठिकाणी भिंतींचे सुशोभन करण्याचे काम दिले आहे. मुंबई आणि कोकणचे कायमच अतूट असे नाते राहिले आहे. कोकणातील या कलाकारांनी आपल्या कलाविष्कारातून मुंबईच्या सौंदर्यात भर घालत, हे नाते अधिक दृढ केले आहे.
सलग तीन महिने हे कलाकार आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून विविध चित्राकृती रेखाटत अंधेरी पूर्व विभागातील भिंती बोलक्या करत आहेत. एकूण ५० हजार चौरस इंचाचे हे काम प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आले असून मार्चअखेरीस ते पूर्णत्वास जाणार आहे. दिवसरात्र मेहनत घेत या कलाकारांनी हे काम आता अखेरच्या टप्प्यापर्यंत आणले आहे. काही ठिकाणी भिंतीची उंची २५ फुटांपर्यंत असल्याने बांबूच्या पराती बांधून कलाकारांना काम करावे लागले आहे. पाण्यात विरघळणाऱ्या डिस्टेंपर रंगांमध्ये या भिंती रंगविल्या जात आहेत. भिंतींवरील चित्रे ही अमूर्त आकारासह मॉडर्न आर्ट प्रकारातील क्रिएटिव्ह स्वरुपाची आहेत.
अविस्मरणीय अनुभव !
बांबूच्या पराती बांधून उंच भिंतींवर चित्रे रेखाटण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. चित्रे रेखाटताना आम्ही आमच्या कामात एवढे तल्लीन होवून जायचो की, आपण २५ फुटांच्या उंचीवर आहोत हे विसरुन जायला व्हायचे. चित्रे रेखाटताना उन्हाचा त्रास होत होता. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर आणि रात्री उशीरापर्यंत काम करत होतो. भिंतींचे सुशोभन करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता. यासाठी आम्हाला ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के सर आणि सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सर, प्राध्यापक अवधूत खातू यांचे मार्गदर्शन लाभले. अमेय कोलते, कलाकार
सह्याद्री कला महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेला एकही विद्यार्थी बेरोजगार रहात नाही , हे आम्ही अभिमानाने सांगतो . येथे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड पाहून त्याला त्याच्या स्वतंत्र शैलीत काम करण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते . आमच्या कला महाविद्यालयात शिक्षण घेतलेले कलाकार आपल्या कलाविष्कारातून मुंबई शहराचे सुशोभन करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
प्रकाश राजेशिर्के : ज्येष्ठ चित्रकार – शिल्पकार