सुपरस्टार चिरंजीवी सर्जा यांचा ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर २८ ऑगस्टपासून मराठीत
मुंबई : २०१८ मध्ये प्रचंड हिट ठरलेला ‘अम्मा आय लव्ह यू’ हा ‘के.एम चैतन्य’ दिग्दर्शित अॅक्शन थ्रीलर असून सुपरस्टार चिरंजीवी सर्जा, सिथारा, निष्विका नायडू, प्रकाश बेलेवडी आणि आपला मराठमोळा अभिनेता रवी काळे, यांसारखे तगडे स्टार अभिनेते आणि अभिनेत्रींच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट आहे. हृदयविकाराने अकस्मात मृत्यू झालेल्या सुपरस्टार ‘चिरंजीवी सर्जा’ यांच्या या चित्रपटाला तीन वर्ष होत असल्याने त्यांस आदरांजली म्हणून हा चित्रपट महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कानाकोपऱ्यात स्थित असणाऱ्या प्रत्येक मराठी रसिक प्रेक्षकाला अस्सल मराठी भाषेत ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’वर २८ ऑगस्ट २०२३ पासून पाहायला मिळणार आहे.
‘अम्मा आय लव्ह यू’ हा हृदयस्पर्शी कौटुंबिक चित्रपट आहे, ज्याची कथा आई आणि तिच्या मुलाच्या नात्याभोवती फिरते. ही कथा एका तरुणाच्या दुःखद जीवनात घेऊन जाते, जिथे त्याच्या आयुष्याच्या गतीने जोरदार वेग घेतलेला असताना त्याची आई गंभीरपणे आजारी पडते. आईबद्दलचे अतीव प्रेम आणि जिव्हाळा दाटून येऊन तो आईच्या ममतेसाठी आईकडे धाव घेऊन, त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बाजूला करून आईचा जीव वाचवण्याच्या दिशेने तो येईल त्या संकटाला लढत जातो. आई आणि मुल यांच्या नाजुक मायाळू नात्यातला हा गोड भावनिक गुंता आहे, जिथे प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रु आल्यावाचून राहत नाहीत.
“आम्ही ‘अम्मा आय लव्ह यू’ चित्रपटाचे प्रतिभावान अभिनेते ‘चिरंजीवी सर्जा’ यांचे अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य मराठी भाषा आणि संस्कृतीमध्येही सतत गुंजत राहावे म्हणून त्यांच्या आठवणींना उजाळा देत, या चित्रपटाचा मराठी डब करून ‘अल्ट्रा झकास’ या आमच्या मराठी ओटीटीच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण करत आहोत. आमचा हा प्रयत्न मराठी रसिक प्रेक्षकांना भावेल अशी आशा आहे.” अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायवेट लिमिटेडचे सी.ई.ओ श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी ‘अम्मा आय लव्ह यू’ मराठी डब वर्जनच्या प्रदर्शना संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या.