महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती
Haldi Kumkum | ‘हळदी-कुंकू’ समारंभांमधून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

- मकर संक्रांतीनंतर महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण
रत्नागिरी : मकर संक्रांतीचा सण संपला असला तरी, महाराष्ट्राच्या घराघरात आणि सोसायट्यांमध्ये सध्या हळदी-कुंकू (Haldi Kumkum) समारंभाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत महिला एकमेकींना वाण देऊन सौभाग्याचा हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आताच्या डीजिटल जमान्यात महिलांचे हळदी कुंकू समारंभ हे हायटेक मंचावर होऊ लागले आहेत.
मैत्री आणि संस्कृतीचा मिलाफ
हळदी-कुंकू हा केवळ धार्मिक विधी नसून महिलांच्या एकत्र येण्याचे आणि सामाजिक बंध दृढ करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. यानिमित्ताने महिला नटूनथटून, पारंपरिक वेषभूषा करून एकत्र जमतात. घराघरात होणाऱ्या या कार्यक्रमांमुळे सध्या बाजारपेठेतही वाण (भेटवस्तू) खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.


यंदाच्या हळदी-कुंकू समारंभाचे विशेष आकर्षण:
- इको-फ्रेंडली वाण: यंदा प्लास्टिकच्या वस्तूंऐवजी कापडी पिशव्या, तुळशीची रोपे किंवा पर्यावरणपूरक वस्तू देण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.
- पारंपरिक उखाणे: कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी महिलांनी घेतलेले एकापेक्षा एक सरस उखाणे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत.
- राजकीय आणि सामाजिक मेळावे: अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांच्या वतीने हळदी-कुंकू निमित्त महिलांसाठी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.





