कोकण मीडिया दिवाळी अंकासाठी ‘कोकणातील ‘खाद्य संस्कृती’ विषयावर लेख स्पर्धा आणि व्हिडिओ स्पर्धा

रत्नागिरी : साप्ताहिक कोकण मीडियाचा दहावा दिवाळी विशेषांक यंदा (२०२५) प्रसिद्ध होणार आहे. त्या निमित्ताने ‘कोकणातील खाद्यसंस्कृती’ या विषयावर लेख स्पर्धा आणि व्हिडीओ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जैवविविधतेमुळे कोकण निसर्गसंपन्न तर आहेच; पण त्या जैवविविधतेमुळेच इथल्या खाद्यसंस्कृतीतही प्रचंड विविधता आहे. शाकाहार, मत्स्याहार आणि मांसाहार या तिन्ही प्रकारांच्या इथे केल्या जाणाऱ्या पाककृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब दिसते. हे पदार्थ तयार करण्यासाठी विशिष्ट साहित्य गोळा करण्यापासून त्याची पाककृती सिद्ध करण्यापर्यंत आणि प्रत्यक्ष खाण्यापर्यंतचे सर्व टप्पे केवळ उदरभरणाचा नव्हे, तर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आणि अनुभूती देणारे असतात. त्यांच्याशी निगडित असलेल्या अनेक आठवणीही असतात. अनेक पदार्थांचे आणि इथल्या सणवारांचे घट्ट नाते आहे; मात्र अनेक वैशिष्ट्यपूर्ण जुने खाद्यपदार्थ आता विस्मृतीत चालले आहेत. या जुन्या कोकणी खाद्यसंस्कृतीच्या जतनासाठी थोडा हातभार लागावा, या उद्देशाने यंदाचा दिवाळी अंक कोकणातील खाद्यसंस्कृती या विषयावर काढायचे ठरवले आहे. त्या विषयावरील साहित्य मागवण्यात येत आहे. पाककृतींविषयीच्या व्हिडिओ स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. कोकणातील खाद्यसंस्कृतीच्या अनुषंगाने कोणतेही साहित्य – म्हणजे पाककृती, कथा, कविता, चित्र, व्यंगचित्र, लेख, इत्यादी – यांपैकी काहीही या अंकासाठी पाठवता येईल; मात्र कोकणातील कोणत्याही पारंपरिक खाद्यपदार्थांशी निगडित आठवणी असलेला म्हणजेच स्मरणरंजनपर ललित लेख किंवा कोकणातील पारंपरिक पदार्थांची माहिती देणारा, वेगळेपण आणि वैशिष्ट्ये सांगणारा, तसेच येथील खाद्यसंस्कृतीविषयी अन्य माहिती देणारा लेख स्पर्धेसाठी पात्र ठरेल. लेख जास्तीत जास्त एक हजार शब्दांपर्यंतचा असावा. लेख कोकणातील बोलीभाषेत लिहिला तरी चालू शकेल; मात्र ते बंधनकारक नाही. कोकणातील खाद्यसंस्कृतीच्या आठवणी सांगणाऱ्या लेखांबरोबरच त्या संदर्भातील प्रथा-परंपरा, चालीरीती, पद्धती, त्यांचे वेगळेपण, महत्त्व, वैशिष्ट्ये यांविषयी माहिती देणारे लेखही स्पर्धेसाठी पात्र ठरतील. जुन्या काळच्या पाककृतीही (रेसिपी) आवर्जून पाठवाव्यात. वैशिष्ट्यपूर्ण पाककृती अंकात प्रसिद्धही केल्या जातील; मात्र निव्वळ पाककृती लेखन (म्हणजे साहित्य, कृती इत्यादी) स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
पाककृती व्हिडिओ स्पर्धेचे नियम :
व्हिडिओ स्पर्धेसाठीही कोकणातील खाद्यसंस्कृती हाच विषय आहे. कोकणात पूर्वीच्या काळी केल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पदार्थांच्या पाककृती तयार करण्याची सगळी प्रक्रिया, त्यातली लगबग, विविध टप्पे व्हिडिओमध्ये असावेत. मोबाइल आडवा (हॉरिझाँटल) धरून व्हिडिओ चित्रित करावा. व्हिडिओ जास्तीत जास्त दहा मिनिटांचा असावा. व्हिडीओमध्ये निवेदन असले तरी चालेल; मात्र कोणतेही पार्श्वसंगीत (Background Music) वापरू नये. पूर्वी अन्य ठिकाणी (यू-ट्यूब किंवा अन्य कुठेही) प्रसिद्ध झालेले व्हिडिओ पाठवू नयेत. व्हिडिओ ज्या पाककृतीचा असेल, ती कृती सोबत लेखी स्वरूपातही पाठवावी.
स्पर्धेतील विजेत्या लेखांसह अन्य निवडक साहित्य अंकात प्रसिद्ध केले जाईल. व्हिडिओ कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केले जातील.
साहित्य पाठवण्यासाठी अंतिम मुदत : १४ सप्टेंबर २०२५
ई-मेल : kokanmedia2@gmail.com
व्हॉट्सअॅप नंबर : 9822255621
पत्ता : संपादक, कोकण मीडिया,
कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर),
मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी ४१५६३९
(दिवाळी अंकासाठी आणि स्पर्धेसाठी साहित्य पाठवताना आपले नाव, पत्ता, वय, संपर्क क्रमांक इत्यादी माहिती सोबत द्यावी.)