महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

गणेशोत्सव शांततेत, सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह

    रत्नागिरी, दि. ३ : येत्या ०७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे. गणेशोत्सव शांततेत, सुरळीत आणि विनाअपघाती व्हावा,  यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना जिल्हाधिकारी एम  देवेंदर सिंह यांनी दिल्या आहेत.

    गणेशोत्सव- २०२४ पूर्व तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. बैठकीस पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.जास्मिन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए. ए. देसाई, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, लांजा तहसिलदार प्रियांका ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता राजेंद्र कुलकर्णी आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात गणेशोत्सवाची पूर्वतयारी जोरात सुरू आहे. प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करुन देणे, जिल्ह्यात खास गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर होईल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सतर्क रहा.

    गणेश भक्तांच्या प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुविधा केंद्र उभारण्याची कार्यवाही करावी. तसेच या ठिकाणी सुविधा केंद्रांवर पोलीस मदत केंद्र, आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष, आपत्कालीन वाहन दुरुस्ती आदी सुविधा असावी. वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका सेवा, मोफत आपत्कालीन वैद्यकीय उपचार सुविधा व मोफत चहा, बिस्कीट, पाणी, ओ.आर.एस. आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

    राष्ट्रीय महामार्ग विभागाने मुंबई-गोवा महामार्गावर कुठेही खड्डे राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दिशादर्शक फलक लावण्याची कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी डायव्हर्शन आहे, त्याठिकाणी रेडीयम दिशादर्शक फलक लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागास दिले. तसेच गणेशोत्सव कालावधीत विद्युत विभागाने वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे सांगितले.

    पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यात पोलिस, होमगार्ड, अधिकारी कर्मचारी बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विसर्जन घाटाकडे जाणारे रस्ते देखील चांगले असणे गरजेचे आहेत. विसर्जन घाटावर लाईट व्यवस्था, बॕरेकॅटस आदीची व्यवस्था करावी. अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी महिला सुरक्षा व शाळा सुरक्षा संदर्भातही आढावा घेतला.

    Team RatnagiriLive

    कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button