जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांचा सोमवारी जन्मोत्सव
श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे विविध कार्यक्रम
नाणीज, दि, १८ : जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा ५८ वा जन्मोत्सव सोहळा श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक, भक्तगण, श्रद्धाळू उपस्थित राहणार आहेत.
यावेळच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून पाच पिठावरून पाच दिंड्या निघाल्या आहेत. नागपूर पिठावरून १३ सप्टेंबर २०२४ रोजी तसेच तेलंगणा पिठावरून २५ सप्टेंबर २०२४ दिंडी निघाली. याशिवाय नाशिक पीठ आणि मराठवाडा पीठ येथून २९ सप्टेंबरला आणि मुंबई पिठावरून ३ ऑक्टोबर २०२४ रोजी दिंडी निघाली. त्यात हजारो भाविक जगद्गुरु श्रींच्या पादुका घेऊन पायी दिंडीने चालत निघालेले आहेत. या पाचही दिंड्या २० ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र नाणीजधाम या मुख्य पिठामध्ये दाखल होतील. या पायी दिंडी मजल दरमजल करत इतक्या दिवसांनी श्रीक्षेत्र नाणीजधाम इकडे पोहोचणार आहेत. या पायी दिंड्या ग्लोबल वार्मिंगमुळे समाजाला होणारा त्रास आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान याबद्दल जनजागृती करत करत येत आहेत. गेल्या दोन वर्षापासून या पायी दिंड्या २१ ऑक्टोबरला मुख्य पीठ नाणीजधाम येथे येत असतात .
२० ऑक्टोबरपासून २२ ऑक्टोबर पर्यंत तीनही दिवस श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे अनेक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
रविवारी सकाळी नैमित्तिक पूजाविधिनंतर मंत्रघोषानंतर सोहळा सुरू होतो. दहा वाजता सप्तचिरंजीव महामृत्यूंजय याग व अन्नदान विधी सुरू होईल.
यावेळी तीन पिठाहून आलेल्या वसुंधरा पायी दिंडीतील यात्रींचे स्वागत होईल.
सकाळी दहापासूनच नाथांचे माहेर, प्रभू रामचंद्र मंदिर, वरदचिंतामणी मंदिर येथील देवताना सोहळ्याचे निमंत्रण मिरवणुकीने जाऊन देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी उत्सवमूर्तींची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ती नाथांचे माहेरहून निघेल व सुंदरगडावरील संतशिरोमणी गजानन महाराज मंदिर येथे सांगता होईल.
सोमवार हा सोहळ्याचा मुख्य दिवस असेल. हा दिवस म्हणजे आनंद सोहळा असतो. अतिशय नयनरम्य असा हा सोहळा पाहण्यासारखा असतो. यादिवशी सप्तचिरंजीव महामृत्युंजय यागाची समाप्ती होईल. दोन पिठाहून निघालेल्या वसुंधरा पायीदिंडीतील यात्रींचे स्वागत होईल. दुपारनंतर चरणदर्शन, पालखी परिक्रमा होईल. सायंकाळी सात वाजता दीदीमां स्वरूप श्रुती यांचे प्रवचन होईल. त्यानंतर प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन होईल. साडेआठला परमवंदनीय जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर १२ पुरोहितांकडून जगद्गुरूंचे औंक्षण व अभिष्टचिंतन होईल. त्यानंतर रात्री दहा वाजता जन्मोत्सव सोहळा सुरू होईल.
मंगळवारी गुरुकृपाग्रह याग होईल. शक्ती प्रतिष्ठापना होईल. त्याचे षोडशोपचारे पूजन होईल. सायंकाळी चार वाजता कुंजवन ते नाथांचे माहेर अशी महा मिरवणूक निघणार आहे.