महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

दापोलीकर सायकलप्रेमींची केदारनाथ सायकल यात्रा यशस्वी

रत्नागिरी : दापोलीतील सायकलप्रेमींनी १२ ते २४ जून २०२५ या कालावधीत हरिद्वार ते केदारनाथ ते हरिद्वार असा ६००+ किमीचा सायकल प्रवास करत केदारनाथ आणि इतर अनेक अध्यात्मिक ठिकाणांना भेटी दिल्या.

या सायकल प्रवासात प्रत्येकाचे साहित्य आपापल्या सायकलवर होते. त्यासाठी कोणतेही वेगळे वाहन वापरण्यात आले नाही. हिंदूंच्या पवित्र चार धामांपैकी एक असलेलं केदारनाथ हे सर्वात उंचीवर वसलेलं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये असून मंदिर समुद्रसपाटीपासून ३५८४ मीटर उंचीवर हिमालयातील गढवाल प्रदेशामध्ये येतं. येथे पोहोचण्यासाठी १७ किमीचे खडतर ट्रेकिंग करावं लागते.

या सायकल प्रवासात दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, शरद भुवड तसेच मुंबई येथील सतिश जाधव (वय ६८), विजय कांबळे, विशांत नवार, नवनीत वरळीकर, विकास कोळी, आदित्य दास सहभागी झाले होते. या सायकल प्रवासात हरिद्वार, ऋषिकेश, शिवपुरी, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, कीर्तीनगर, गुप्तकाशी येथील श्री काशी विश्वनाथ मंदिर, महाकवी कालिदास यांना विद्या प्राप्त झालेले महाकाली मंदिर कालीमठ, हिवाळ्यात केदारनाथ मंदिर बंद झाल्यावर देवाच्या मूर्ती ज्या ठिकाणी आणल्या जातात ते उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिर, अगस्त ऋषींची तपोभूमी अगस्तमुनी, गौरीकुंड, केदारनाथ धाम, आदि शंकराचार्य समाधी, शिवपार्वती यांचे लग्न झालेले ठिकाण त्रियुगी नारायण, धारीदेवी मंदिर श्रीनगर इत्यादी अनेक ठिकाणे पाहण्यात आली. गंगा नदीत रिव्हर राफ्टिंग पण केले. अनेक स्थानिक खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला.

याबद्दल अधिक माहिती देताना दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी सांगितले की, देवभूमी हिमालयातील उत्तराखंड गढवाल भागातील डोंगर निसर्ग अनुभवत, गंगा, अलकनंदा, मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याने सायकल चालवणे खूपच आव्हानात्मक आहे. या सायकल प्रवासात रस्त्यावर आलेल्या दरडी, त्यामुळे झालेले वाहनांचे ट्रॅफिक, थंडी, वारा, पाऊस, न संपणारे घाट रस्ते, तीव्र चढ उतार, मार्गावरील चिखल, बर्फाचे ग्लॅसिअर अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले. परंतु टीमचा सराव, एकजूट आणि मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून झालेले स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी, निसर्गाची अपार सुंदरता, अध्यात्मिक वातावरण यामुळेच ही सायकल यात्रा संस्मरणीय यशस्वी झाली. आम्हीही या सर्वांना पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. आव्हानात्मक अशी केदारनाथ यात्रा सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button