महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसायन्स & टेक्नॉलॉजीसाहित्य-कला-संस्कृतीहेल्थ कॉर्नर

दापोलीकर सायकलप्रेमींची पुणे- पंढरपूर-अक्कलकोट-गाणगापूर सायकल वारी उत्साहात संपन्न

  • सलग तीन दिवस ४५० किलोमीटरचे अंतर कापत केली वारी पूर्ण

दापोली : पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांचा श्वास. या पंढरीच्या वारीची थोरवी माहिती सांगावी तितकी थोडी, ती अनुभवावीच लागते. दरवर्षी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते. या आषाढी वारीमध्ये खूप जनसमुदाय सहभागी होतो. तसेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ देवस्थान आणि कर्नाटकातील गाणगापूर दत्त मंदिर देवस्थान दर्शनाला अनेकजण जातात. १५, १६ व १७ जून २०२४ रोजी दापोलीतील सायकलप्रेमींनी पुणे, पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूर असे तीन दिवसात तब्बल ४५० किमी अंतर सायकल चालवत सायकल वारी पूर्ण केली.

या सायकल वारीमध्ये दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव, यश भुवड, समिर गोलम सहभागी झाले होते. सोबत मुंबई येथील सतिश जाधव, शिवम खरात व बसवेश्वर पडेलकर यांनीही ही सायकल वारी पूर्ण केली. पहिल्या दिवशी पुणे ते पंढरपूर २४० किमीची सायकल वारी इंडो एथलेटिक सोसायटी पुणे सोबत केली. दुसऱ्या दिवशी पंढपूर मंगळवेढा सोलापूर अक्कलकोट असा १२५ किमीचा सायकल प्रवास झाला. तिसऱ्या दिवशी अक्कलकोट ते गाणगापूर असा ८५ किमीचा सायकल प्रवास झाला.

याबद्दल अधिक माहिती देताना दापोली सायकलिंग क्लबचे अंबरीश गुरव यांनी सांगितले की, पंढरीच्या वारीमध्ये चालत सहभागी व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे. परंतु जास्त दिवस सुट्टी घेता येत नसल्यामुळे आम्ही पुणे पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर या ४५० किमीच्या मार्गावर सायकल चालवत सायकल वारी केली. यासाठी आम्ही काही दिवसापासून सायकल चालवण्याचा सराव करत होतो. वारी मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी अनुभव होता. पंढरीची वारी सायकल चालवत पूर्ण केल्याबद्दल या सर्वांचे कौतुक होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button