महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

नवी दिल्लीतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात धीरज वाटेकर सहभागी होणार

चिपळूण : येथील चरित्र लेखक-पत्रकार आणि कोकण ‘पर्यावरण-पर्यटन’ क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांना नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘परिसंवाद वक्ते’ म्हणून निमंत्रण मिळाले आहे.

भारत सरकारच्या ‘हाफकिन’ संस्थेने शोधलेल्या विंचूदंशावरील लसीचे ‘प्रवर्तक’ आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय उर्फ तात्यासाहेब नातू या दैवी अंश लाभलेल्या डॉक्टरांच्या एका आगळ्यावेगळ्या क्षेत्राला जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तीचे मराठी साहित्यात अपवादाने पाहायला मिळणाऱ्या ७०८ पृष्ठांच्या प्रेरणादायी ‘जनी जनार्दन’ या महाचरित्रासह नऊ पुस्तकांचे वाटेकर लेखक आहेत.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे आयोजित हे संमेलन २१, २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संमेलनाचे उद्घाटक, ‘पद्माविभूषण’ शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तर लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला या विषयांच्या गाढ्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या संमेलनाध्यक्ष आहेत. संमेलनात २२ रोजी ज्येष्ठ साहित्यिक जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४ ते ५.३० वाजता होणाऱ्या, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या विषयावरील परिसंवादात वाटेकर आपले विचार मांडणार आहेत. वाटेकर यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थक्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन ही ५ पर्यटनविषयक आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी, कृतार्थीनी आणि जनी जनार्दन ही ४ चरित्र आदी ९ पुस्तकांचे लेखन केले आहे. ‘गेट वे ऑफ दाभोळ’ आणि ‘वाशिष्टीच्या तीरावरून’ या दोन संशोधित ग्रंथांची निर्मिती, ‘व्रतस्थ’ या कोकण इतिहास संशोधक स्वर्गीय अण्णा शिरगावकर यांच्या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. विविध विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक आदी सुमारे ३५हून अधिक संग्राह्य अंक आणि पुस्तिकांचे संपादन त्यांनी केले आहे. त्यात कोकणातून गेली दीडशे वर्षे सातत्याने प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक सत्यशोधकचा सुमारे ४६० पानांचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी विशेषांक आणि कोयना जलविद्युत प्रकल्पासह अलोरे (चिपळूण) गाव वसाहतीच्या गत पन्नास वर्षांच्या दुर्मीळ इतिहासाचा मागोवा असलेल्या शाळेच्या ४५०पानी संग्राह्य स्मरणिकेचा समावेश आहे. ते कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी सलग १४ वर्षे दैनिक दैनिक पुढारी, दैनिक लोकसत्ता याकरिता ग्रामीण पत्रकारिता केली आहे. मुक्त पत्रकार म्हणून राज्यभरातील विविध नियतकालिकातून सातत्याने ते वैचारिक लेखन करत असतात. वाटेकर हे प्रसन्न प्रवास (http://dheerajwatekar.blogspot.com) या नावे ब्लॉगलेखन करत असून त्यांच्या ब्लॉगला सुमारे ६५ हजार पेज व्ह्यूज मिळालेले आहेत. धीरज वाटेकर यांच्याकडे संदर्भीय कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, “परमचिंतन” अभ्यासिका आणि वस्तूसंग्रहालय (निवडक दुर्मीळ) आहे. त्यांनी संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन (१२ हजार प्रतींचे वितरण) केले आहे.  

त्यांना आजवर भारत सरकार नेहरू युवा केंद्र रत्नागिरीचा उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार (२००४), कोल्हापूरचा चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाचा ग्रंथ पुरस्कार (२०१६-ठोसेघर पर्यटन), पर्यावरणीय जनजागृती कार्यासाठी तेर पॉलिसी सेंटर पुणे यांचा ‘प्रकाशाचे बेट’ पुरस्कार (२०१८) तसेच एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती (२०२२), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (२०२३) यांनीही पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. विश्व संवाद केंद्र मुंबई यांचा २०२४चा प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. वाटेकर यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोकण प्रतिनिधी आणि इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, नामवंत कवी-समीक्षक आणि भाषाशास्त्राचे अभ्यासक अरुण इंगवले, चिपळूण ‘को.म.सा.प. अध्यक्षा डॉ. रेखा देशपांडे, जिल्हा प्रतिनिधी व कवी राष्ट्रपाल सावंत, चिपळूण ‘म.सा.प’चे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे कार्याध्यक्ष विलास महाडिक आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button