पर्यावरण जागृतीच्या ३’वसुंधरा दिंड्या’ नाणीजकडे येण्यास रवाना
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या वाढदिनी येत्या २१ ला येणार
नाणीज : ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृतीचा व त्यासाठी झाडे लावा-झाडे जगवा-पर्यावरण वाचवा असा संदेश देत नाशिकहून श्रीक्षेत्र नाणीजला पायीदिंडी निघाली आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज स्थापित स्व-स्वरूप संप्रदायाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठाकडून या दिंडीचे आयोजन केले आहे. मुंबई व परभणीहून सुद्धाअशा दिंड्या श्रीक्षेत्र नाणीजयेथे येणार आहेत.
उत्तरमहाराष्ट्रची दिंडी नाशिकहून, मराठवाडा विभागाची दिंडी परभणीहून निघाली आहे. मुंबई उपपीठाची दिंडी वसईहून उद्या निघणार आहे. तीनही दिंड्या २१ ऑक्टोबर रोजी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या ५८ व्या जन्मदिन सोहळ्यादिवशी नाणीजमध्ये पोहोचतील. यातील सर्वजण वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
सध्या प्रचंड वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे, निसर्गाचे संतुलन ढासळले आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे तपमान वाढत आहे. त्याचा पर्यावरण, शेती उत्पादन यावर मोठा परिणाम होते आहे. त्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या दिंड्यांमधून केला जाणार आहे.
या दिंड्यामध्ये हजारो लोक सहभागी होत आहेत. वाटेत आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमध्ये ते संदेश देणार आहेत. ग्लोबल वॉर्मिग कशामुळे होते, त्याचे शेतीवर काय काय परिणाम होत आहेत. हे भावी पिढीसाठी किती हानीकारक आहे. कोणत्या कारणाने हे संकट वाढत आहे. काय केले असता ते आटोक्यात येईल याबाबत तेथील लोकांना मार्गदर्शन करणार आहेत. या दिंड्यांना ‘ वसुंधरा पायी दिंडी’ असे नाव दिले आहे.
महत्वाचे म्हणजे दिंड्यांतील लोक केवळ मार्गदर्शन करणार नसून ते स्वतःदेखील त्याचे आचरण करणार आहेत. ते लोक स्वतःची ताटवाटी सोबत घेऊन निघणार आहेत. जेणेकरून जेवणापासून चहा, नष्टा करण्यासाठी त्यांना प्लास्टिक अथवा कागदाचे कप व डीशेस वापराव्या लागणार नाहीत. दिंडी पुढे पुढे जाईल तसतसे मागे कचरा होणार नाही यासाठी विशेष सेवेकरी पथक या प्रत्येक दिंडीत असणार आहे. त्यांनी स्वच्छता सुरू केली आहे.
दिंड्यांतील सर्व सहभागी स्त्री-पुरुषांना विशिष्ट गणवेश परिधान केला आहे. अनेकांच्या हातात पर्यावरण जागृती करणारे फलक आहेत. विविध रंगांचे ध्वज आहेत. अग्रभागी फुलांनी आकर्षक सजवलेला रथ आहे. दिंड्यांमध्ये शिस्त वाखाणण्याजोगी आहे. सर्वजण रांगेने जात आहेत.
दिंड्यांमधील यात्रेकरुंची या काळात विशेष काळजी घेण्यात येणार आहे. तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी एक रुग्णवाहिकाही असणार आहे. त्यात डॉक्टरांचे एक पथक सज्ज असेल. अशा या आगळ्यावेगळ्या दिंड्या आहेत. यामध्ये सर्व वयोगटांतील स्त्री-पुरूष भाविक उत्साहाने सहभागी झाले आहेत. त्यात तरुणांचा सहभाग मोठा आहे.