पैसा फंडची ख्याती राज्यात सर्वदूर : पूजा निकम
विविध गुणदर्शन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची कला बहरते
संगमेश्वर दि. १२ : प्रशालेत संपन्न होणारे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम म्हणजे, विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना प्रदर्शित करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. शालेय स्तरावरच्या अशा सर्वच आठवणी अविस्मरणीय असतात. व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वरने स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक एक पैसा गोळा करत ही शैक्षणिक संस्था उभी केली. या संस्थेतून आजवर असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडले आणि यशस्वी झाले. जिद्द आणि त्याग यामुळे पैसा फंड संस्थेची आणि प्रशालेची ख्याती राज्यात सर्व दूर पसरली असल्याचे प्रतिपादन चिपळूण पंचायत समितीच्या माजी सभापती आणि प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष पूजा निकम यांनी केले.
व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पूजा निकम या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर विद्या मंदिर मंडळ माहीमच्या अध्यक्ष शशिताई मुळये, संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य रमेश झगडे, सोनाली मुळये, मिता शेट्ये, माजी विद्यार्थी विनायक पाथरे, संजय बांदिवडेकर, ग्राप सदस्य योगिनी डोंगरे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. पूजाताई निकम यांच्या हस्ते विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना पूजाताई निकम पुढे म्हणाल्या की , शाळेतून शिकून गेल्यानंतर माजी विद्यार्थ्यांनी कधीही आपल्या शाळेला विसरू नये. ज्या शाळेने आपल्याला गुणसंपन्न केले, ज्ञान दिले त्या शाळेचे उतराई होण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी करावा , असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
विद्या मंदिर मंडळ माहीमच्या अध्यक्ष शशी ताई मुळये आपल्या मनोगतात म्हणाल्या की, पैसा फंड संस्थेने आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा विचार करता १९२९ साली आपल्या व्यापारातील होणाऱ्या नफ्यामधून एक एक पैसा बाजूला करत गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन खुले करून दिले. यामुळे परिसरातील असंख्य विद्यार्थी ज्ञानसंपन्न झाले. संस्थेने लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला पाहून खूप समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा खास गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले.