प्रद्योत कलादालनात पाहता येणार निसर्गातील ‘ऋतुरंग’

- चित्रकार विष्णु परीट, माणिक यादव यांच्या चित्रांचे प्रदर्शन; १९ मे रोजी उद्घाटन
संगमेश्वर दि. १७ ( प्रतिनिधी ): कोकणच्या निसर्गाची किमया आपल्या जादुई कुंचल्यातून आणि प्रवाही जलरंगातून केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरातील कलारसिकांना दाखविणाऱ्या विष्णू गोविंद परीट आणि प्राचार्य माणिक शिवाजी यादव या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन दिग्गज कलाकारांच्या एकापेक्षा एक सुंदर अशा कलाकृतींचे प्रदर्शन रत्नागिरी येथील प्रद्योत आर्ट गॅलरीमध्ये दि. १९ मे ते २५ मे या कालावधीत भरणार असून जिल्ह्यातील कलारसिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतीतील कोकणच्या निसर्गाचे आगळे वेगळे रूप जवळून पहावे, असे आवाहन डॉ. प्रत्युष चौधरी आणि गॅलरीची क्युरेटर युवा चित्रकार मयुरी घाणेकर यांनी केले आहे.

विष्णू गोविंद परीट हे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बाल वयातच आवड म्हणून त्यांच्या हाती कुंचला आला. गेली ४० वर्ष त्यांच्या हाती रंग आणि कुंचला असल्याने सततच्या सरावामुळे त्यांनी कुंचला आणि रंग यावर जबरदस्त प्रभुत्व मिळवले आहे. कोकणच्या निसर्गाजवळ एकरूप झालेल्या या कलाकाराची खासियत म्हणजे त्यांच्या जादुई कुंचल्यातून रंग पटलावर पसरवला जाणारा हिरवा रंग. निसर्गाचे खूप जवळून आणि बारकाईने निरीक्षण करण्याची सवय असल्याने परीट यांच्या चित्रातील निसर्ग हा नेहमीच जिवंत भासतो. जलरंगात आजवर त्यांनी पाचशेपेक्षा अधिक कलाकृती रेखाटल्या आहेत. त्यांच्या जलरंगातील कलाकृतींना आजवर अनेक पारितोषिकेही प्राप्त झाली आहेत.

मुंबई, पुणे , कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, चिपळूण अशा विविध ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आहेत. कलाकाराचा हात सतत हलता आणि फिरता राहिला पाहिजे , असे विष्णू परीट यांचे मत आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या , सह्याद्री कला महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करणारे माणिक शिवाजी यादव यांचे जलरंगासह ऍक्रेलिक रंगावर जबरदस्त प्रभुत्व आहे. अत्यंत कमी वेळात समोर दिसणारा निसर्ग हुबेहू आपल्या रंगपटलावर साकारण्यात त्यांचा हातखंड आहे. स्वभावाने दिलखुलास असणारे यादव, शेतकरी पुत्र आहेत. त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या कलाकृतीतून कलारसिकांना अनुभवता येतात. सह्याद्री कला महाविद्यालयाच्या सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पार पाडताना माणिक यादव यांनी आजवर आपल्या कला महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेश शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध कला महाविद्यालयांसाठी प्रत्यक्ष निसर्ग चित्र स्पर्धांचे अनेक वर्ष यशस्वी आयोजन केले आहे .

विष्णू परीट आणि माणिक यादव हे दोन्ही चित्रकार निसर्गाकडे झुकणारे असल्याने या दोघांनी आजवर कोकणच्या ग्रामीण भागासह, कोकणला लाभलेली भव्य समुद्र किनारपट्टी, ग्रामीण जीवन, शेतकरी अशा अनेक विषयांवर एकापेक्षा एक अशा सुंदर कलाकृती साकारल्या आहेत. माणिक यादव यांनी आजवर मुंबई, पुणे, कोल्हापूर सांगली, इचलकरंजी, चिपळूण या ठिकाणी आपल्या चित्रांची प्रदर्शने भरवली आहेत. कलारसिकांना या दोन्ही कलाकारांच्या निवडक कलाकृती प्रद्योत आर्ट गॅलरीत भरणाऱ्या प्रदर्शनात कलाकृती पाहण्याची आणि त्या खरेदी करण्याची सुवर्णसंधी कलारसिकांना, उद्योजकांना उपलब्ध झाली आहे.
डॉक्टर प्रत्युष चौधरी यांच्या प्रद्योत आर्ट गॅलरीत मीरा संकुल, टीआर पी, रत्नागिरी येथे १९ मे रोजी सायंकाळी ४ वाजता ” ऋतुरंग ” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी चिपळूण संगमेश्वरचे आमदार आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम, सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन आणि ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजे शिर्के, डॉ. प्रत्युष चौधरी, जिल्ह्यातील नामवंत चित्रकार – शिल्पकार, कला महाविद्यालयातील विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे कला प्रदर्शन २५ मे पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत कलारसिकांना पाहण्याची संधी असून यावेळी आवडणाऱ्या कलाकृती कलारसी खरेदी करू शकणार आहेत. या कला प्रदर्शनाला कलारसिकांनी , रत्नागिरीतील नागरिकांनी, कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन चित्रकार विष्णू परीट , प्राचार्य माणिक यादव, प्रद्योत आर्ट गॅलरीची क्युरेटर युवा चित्रकार मयुरी घाणेकर यांनी केले आहे.