मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयात लो. टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

चिपळूण,मांडकी-पालवण, 01 ऑगस्ट 2025 :
कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी-पालवण संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय व जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमात दोन्ही थोर व्यक्तींच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली.
या प्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संकेत कदम यांनी लोकमान्य टिळकांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेचे महत्त्व विशद केले. त्यांनी टिळकांच्या दूरदृष्टी, राष्ट्रप्रेम आणि समाजसुधारणेसाठी केलेल्या योगदानाला उजाळा दिला. तसेच, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देताना, त्यांच्या साहित्यनिर्मिती, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे महत्त्व सांगितले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजात जागृती निर्माण करण्याचे मोठे कार्य केले, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांमधून कु. उज्वल भेंडे, कु.आर्या गायकवाड, कु. स्वरांजली रामशे, कु.प्राजक्ता कुंभार, कु. वैभवी माने, कु. सुजय माजगावकर तसेच प्राध्यापकांमधून प्रा. सम्मेद वडगावे व प्राध्यापिका करिष्मा मनेर यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी श्रावणी कदम आणि आभार प्रदर्शन हे कुमारी हर्षा राजपूत या विद्यार्थिनींनी केले.
या कार्यक्रमासाठी गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम , डॉ.पांडुरंग मोहिते डॉ. सुनील दिवाळे, डॉ. अपर्णा यादव, प्रा. ज्ञानोबा बोकडे तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.