माणूस घडवणारे संस्कारक्षम शिक्षण गरजेचे : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज
प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात
नाणीज दि. १०: आजच्या काळात उत्तम इंग्रजी शिक्षणाबरोबरच उत्तम संस्कारांची सुद्धा नितांत आवश्यकता आहे. माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे शिक्षण देणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू नरेद्राचार्यजी महाराज यांनी आज केले.
ते येथील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात बोलत होते.
जगद्गुरूश्री पुढे म्हणाले, “वडीलधाऱ्याविषयी आदरभावना, देश प्रेम, निसर्ग रक्षण असे विविध संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी नेहमीच अनेक उपक्रम सातत्याने राबविले जातात.”
यावर्षीचे स्नेहसंमेलन वसुंधरा रक्षण या संकल्पनेवर आधारित होते. मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण म्हंणजेच आपल्या पृथ्वीचे रक्षण, जलसंवर्धन वृक्षारोपण सेंद्रिय शेती असे विविध प्रकारचे संदेश देणारे कार्यक्रम सुंदररित्या सादर केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज, गुरुमाता सुप्रियाताई उपस्थित होत्या.
प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अबोली पाटील यांनी जगद्गुरुश्री व गुरुमाता यांचे औक्षण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रशालेचे चेअरमन अर्जुन फुले यांनी प्रशालेच्या कार्याचा तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच कला, क्रीडा, विविध बाह्यपरीक्षा यामध्ये संपादीत केलेल्या यशाचा आढावा सादर केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवता वाढविण्यासाठी व त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्रशालेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सुदधा त्यांनी दिली.
यावेळी उपस्थितांमध्ये नाणीजचे सरपंच विनायक शिवगण, पोलीस पाटील नितीन कांबळे, माजी सरपंच दत्ताराम शिवगण व गौरव संसारे, विस्तार अधिकारी पी. एन. सुर्वे, फायर सेफ्टी अधिकारी मयेकर, संस्थेचे मुख्य विश्वस्त शांताराम दरडी, संस्थानचे सीईओ सुनील ठाकूर, माजी सीईओ विनोद भागवत, डेप्युटी सीईओ विवेक कांबळी, राजन बोडेकर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रशालेला आर्थिक स्वरूपात सहाय्य करणाऱ्या दात्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर वसुंधरा वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात श्रीगणेशवंदनेने झाली.
वसुंधरा रक्षण ही सर्व कार्यक्रमांची मध्यवर्ती संकल्पना होती व त्यावर आधारित नृत्य, नाट्य गायन अशा विविधांगी माध्यमातून विद्यार्थ्यांनी सुंदर कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांना कार्यक्रम सादरीकरणासाठी भव्य असा रंगमंच उभारण्यात आला होता. मोठी एलइडी स्क्रीन व नेत्रदीपक प्रकाशयोजना यामुळे कार्यकमाची रंगत अजूनच वाढली..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वजीर अमीनगड, त्रिशा सुवारे व पूजा ताम्हणकर यांनी केले. कार्यकमाचे नृत्यदिग्दर्शन
संयोगिता निनाद आगासकर, मीनल गायकवाड,जागृती पाटील यांनी केले.