रत्नागिरीत ईद ए मिलाद उत्साहात साजरी ; शहरात भव्य जुलूस

रत्नागिरी: इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा १५०० वा जन्मदिवस रत्नागिरी शहरात ‘ईद ए मिलाद’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगलमय प्रसंगाचे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे शहरात भव्य जुलूस (रॅली) आयोजित करण्यात आली होती.
या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने दुचाकी आणि चारचाकी वाहने सहभागी झाली होती. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या जुलूसने शहरातील उद्यमनगर, कोकणनगर आणि मारुती मंदिर या प्रमुख मार्गांवरून फेरी मारली. कोकणनगर येथे या जुलूसचा समारोप झाला.
यावेळी दावते इस्लामी रत्नागिरी शाखेचे सदस्य उवेज जरीवाला, अली असगर अत्तारी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. तसेच, गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरी अध्यक्ष फारुक जरीवाला यांनीही सहभाग घेतला. या निमित्त उपस्थित सर्वांना ‘नियाज’चे वाटप करण्यात आले.
या जुलूसला कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोलाची भूमिका बजावली.