रत्नागिरीतील प्रज्योत आर्ट गॅलरीत सिद्धांत चव्हाण यांच्या चित्रांचे प्रदर्शन
संगमेश्वर दि. १२ : रत्नागिरी येथील युवा चित्रकार सिद्धांत दीपक चव्हाण यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन डॉ. प्रत्युष चौधरी यांच्या प्रज्योत आर्ट गॅलरीत आजपासून दि. १८ मे पर्यंत भरविण्यात आले आहे. रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील कलारसिकांनी या प्रदर्शनाला सकाळी ११ ते सायं. ७ वाजेपर्यंत भेट द्यावी, असे आवाहन प्रज्योत आर्ट गॅलरी तर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार आणि कला रसिकांसाठी डॉ. प्रत्यूष चौधरी यांनी रत्नागिरी येथे प्रज्योत आर्ट गॅलरी ची उभारणी केली आहे. जिल्ह्यात अनेक कलाकार आणि शिल्पकार आहेत मात्र त्यांना आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन करण्यासाठी जागेची उपलब्धता नव्हती. कलाकारांची ही अडचण लक्षात घेऊन डॉ. प्रत्युष चौधरी यांनी रत्नागिरी येथे मित्र संकुल, टी आर पी, हॉटेल सावंत पॅलेस च्या समोर प्रज्योत आर्ट गॅलरीची उभारणी केली आहे. या गॅलरीची क्युरेटर म्हणून युवा चित्रकार मयुरी घाणेकर ही काम पाहत आहे. तसेच सिद्धांत चव्हाण हा या गॅलरीचा चित्रकार म्हणून सध्या काम करत आहे.
सिद्धांत घाणेकर याचे कलाशिक्षण देवरुख कला महाविद्यालयामध्ये संपन्न झाले. त्याने बॅचलर ऑफ फाईन आर्टची पदवी प्राप्त केली आहे. सिद्धांतने यापूर्वी रत्नागिरी आणि मुंबई येथील कला प्रदर्शनात ग्रुप शो मध्ये सहभाग घेतला होता. तसेच त्याने डिसेंबर २०२३ रोजी ‘ काळा घोडा ‘ येथेही सहभाग नोंदवला होता.
रत्नागिरीमध्ये उभारण्यात आलेल्या प्रज्योत आर्ट गॅलरीत आपल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचे सिद्धांतने ठरवले. दि. १२ मे ते १८ मे या कालावधीत कलारसिकांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. प्रत्युष चौधरी, सौ. चौधरी, कलाशिक्षक रुपेश पंगेरकर, क्युरेटर मयुरी घाणेकर, सिद्धांतचे सर्व कुटुंबीय आणि कला रसिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.